पुणे पालिका शाळांमध्ये मंगळवारपासून डोळे तपासणी अभियान | पुढारी

पुणे पालिका शाळांमध्ये मंगळवारपासून डोळे तपासणी अभियान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या पुणे जिल्ह्यात डोळ्यांची साथ आल्याचे निदर्शनास आले आहे. संसर्गजन्य आजार शालेय विद्यार्थ्यांमध्ये पसरू नये म्हणून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मंगळवारपासून (दि. 1) डोळे तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. गुलटेकडी येथील स्वर्गीय प्रल्हाद ऊर्फ पप्पाशेठ खन्ना प्राथमिक इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पहिली ते चौथीमधील 8-9 मुलांना ‘आय फ्लू’ झाल्याचे महापालिकेला कळवण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये नेत्रतज्ज्ञांसह आरोग्य कर्मचा-यांकडून अभियान राबवले जाणार आहे. सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून आलेल्या मुलांना पुणे मनपा दवाखान्यात संदर्भित करण्यात येणार आहे. पालकांनी या अभियानासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे. डोळे आल्यास लाल होणे, खाज येणे, सूज येणे, डोळ्यांतून पिवळा चिकट द्राव येणे अशी लक्षणे प्रामुख्याने आढळत आहेत. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये हा आजार वाढू नये यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. ज्या भागात डोळ्यांची साथ अथवा रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात
येत आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांची औषधे देऊ नयेत

सध्या पुण्यासह राज्याच्या इतर भागांमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे. त्यामुळे रुग्ण औषध विक्रेत्यांकडे डोळ्यांत घालण्यासाठी औषधांची मागणी करत आहेत. मात्र, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अर्थात प्रीस्क्रिप्शनशिवाय देऊ नये, असे आवाहन पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. स्टेरॉईड असलेल्या कोणत्याही औषधांचा अनियंत्रित वापर केल्यास काचबिंदू आणि मोतीबिंदूसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे अशा कारणांसाठी रुग्ण प्रीस्क्रिप्शनशिवाय औषध मागण्यास आल्यास त्यांना नजीकच्या सरकारी, निमसरकारी किंवा खासगी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ला घेण्यास सांगावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंदार परांजपे आणि सचिव डॉ. सागर वर्धमाने यांनी केले आहे.

हेही वाचा :

सुरक्षा रक्कम भरली नसल्यास वीजपुरवठा खंडित करणार

पुणे : पदवी प्रमाणपत्रासाठी भरा अर्ज

Back to top button