जागतिक हिपॅटायटीस दिवस : गर्भावस्थेत हिपॅटायटीसचा धोका जास्त | पुढारी

जागतिक हिपॅटायटीस दिवस : गर्भावस्थेत हिपॅटायटीसचा धोका जास्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महिला हिपॅटायटीसग्रस्त असेल, तर गर्भधारणेमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. अतिजोखमीची प्रसूती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेष सेटअपची गरज भासते. गर्भावस्थेत हिपॅटायटीसचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ‘जागतिक हिपॅटायटीस डे’ दर वर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या द़ृष्टीने विषाणूजन्य हिपॅटायटीसच्या जागतिक समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा यामागील हेतू आहे. हेपेटोट्रॉपिक विषाणूचे दोन प्रकार आहेत.

हिपॅटायटीस ए आणि ई हा पाण्यातून होणारा संसर्ग आहे. हिपॅटायटीस बी आणि सी हे संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्काद्वारे पसरतो. हिपॅटायटीस ए हे या आजाराचे सामान्य कारण आहे. दूषित अन्न आणि पाणी सेवन केल्याने हा पसरतो.
गर्भधारणेनंतर हिपॅटायटीसचे निदान झाल्यास ‘व्हायरल लोड’ पाहण्यासाठी विशिष्ट तपासण्या केल्या जातात. त्यातून संसर्गाची तीव्रता तपासली जाते. रुग्ण एकदा ‘हिपॅटायटीस बी’ पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यावर आजार पूर्ण बरा होण्याचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते; म्हणूनच विवाह जुळवताना प्रामुख्याने एचआयव्ही आणि एचबीएसएजी या तपासण्या केल्या जातात.

लसीकरण न झालेल्यांना आजाराचा धोका असतो. आईकडून बाळाला हिपॅटायटीसचे संक्रमण होते. अशा वेळी बाळाला इम्युनो ग्लोब्युलिनमधून तयार अँटिबॉडी दिल्या जातात आणि लसीकरण केले जाते.

                                            – डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ

बाळाला जन्मत: हिपॅटायटीसची लस देणे आवश्यक असते. जन्मल्यानंतर एक महिन्याने बाळाला पुन्हा लस देणे आवश्यक असते. यानंतर दोन महिन्यांनी आणि नंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर बाळाला हिपॅटायटीसची लस द्यायला हवी.
                                                – डॉ. वर्षा देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ

हेही वाचा :

राज्यातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सॅटेलाईटद्वारे ‘वॉच’ ठेवणार

PM Modi : दिशाभूल करण्यासाठीच इंडिया आघाडीचे अस्तित्व; पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

Back to top button