दोन वर्षांत शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या झाली दुप्पट ! | पुढारी

दोन वर्षांत शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या झाली दुप्पट !

गणेश विनोदे

वडगाव मावळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे तीनतेरा झाल्याचे दैनिक पुढारीने वृत्तमालिकेद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर खडबडू जागे झालेल्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून दोन गतवर्षी व यावर्षीच्या निकालात चांगला परिणाम झालेला दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी गुणवत्ता यादीत 34 विद्यार्थी आले होते तर यावर्षी ही संख्या 68 झाली आहे. त्यामुळे दोन वर्षांत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.

1253 विद्यार्थी उत्तीर्ण

यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गतवर्षीच्या मानाने अधिक समाधानकारक निकाल लागला असल्याचे दिसते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालानुसार यावर्षी मावळ तालुक्यातील परीक्षेस बसलेल्या इयत्ता पाचवीच्या 2 हजार 783 विद्यार्थ्यांपैकी 1253 विद्यार्थी पास झाले आहेत. तर, 1530 विद्यार्थी नापास झाले आहेत. आठवीच्या 1246 विद्यार्थ्यांपैकी फक्त 160 विद्यार्थी पास झाले असून, तब्बल1086 विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच, गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळेचे 44 व खासगी शाळांचे 24 असे एकूण 68 विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

दोन वर्षांपूर्वी फक्त 34 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

दोन वर्षांपूर्वी सन 2020-21 मध्ये इयत्ता पाचवीच्या परीक्षेस बसलेल्या 1 हजार 967 विद्यार्थ्यांपैकी फक्त 191 विद्यार्थी पास झाले होते. तर, तब्बल 1 हजार 776 विद्यार्थी नापास झाले होते. आठवीच्या 598 विद्यार्थ्यांपैकी फक्त 65 विद्यार्थी पास झाले व तब्बल 533 विद्यार्थी नापास झाले होते. तसेच, गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळेचे अवघे 12 व खासगी शाळांचे 22 असे फक्त 34 विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते. तसेच, तब्बल 65 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. त्यामुळे मावळचे स्थान जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सहाव्या तर खासगी शाळांमध्ये नवव्या स्थानावर होते.

यासंदर्भात दैनिक पुढारीने मावळचा शैक्षणिक विकास ठरतोय भकास, मावळच्या शैक्षणिक भकास अवस्थेला जबाबदार कोण? व शिष्यवृत्तीच्या शून्य टक्के निकाल लागलेल्या 65 शाळांना नोटिसा, अशी मावळ तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची वास्तव व भयानक स्थिती दर्शवणारी शिक्षणाचे तीन तेरा ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. दैनिक पुढारीच्या या वृत्तमालिकेमुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आणि पुढील वर्षीच्या परीक्षेत गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने तयारीला लागला होता.

यावर्षी 6 शाळांचा निकाल शून्य टक्के

शिक्षण विभागाने केलेल्या तयारीचा परिणाम म्हणून गतवर्षी 55 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश मिळविले व दोन वर्षांपूर्वी 65 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. त्यात कमालीची घट होऊन 11 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. यावर्षी जिल्हा परिषद शाळांचे 44 व खासगी शाळांचे 24 असे एकूण 68 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून फक्त 6 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. एकंदर दरवर्षी गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची वाढती संख्या, शून्य टक्के निकाल लागत असलेल्या शाळांच्या संख्यांमध्ये झालेली घट पाहता शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालामध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे दिसते.

या शाळांतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत

यावर्षीच्या गुणवत्ता यादीत पाचवीमध्ये आढे व पिंपळोली जिल्हा परिषद शाळेचे सर्वांधिक 7 विद्यार्थी चमकले असून, कान्हे शाळेचे 6 विद्यार्थी, परंदवडी शाळेचे 5 विद्यार्थी, साते, जांभूळ, भोयरे व पिंपळोली या शाळांचे प्रत्येकी 3 विद्यार्थी, दारुंब्रे शाळेचे 2 विद्यार्थी तसेच टाकवे बुद्रुक, कोयते वस्ती, धामणे, आढले बुद्रुक, सांगावडे, ओव्हळे, पाचाणे व कुसगाव पमा या शाळांचे प्रत्येकी 1 तसेच आठवीमध्ये पिंपळोली शाळेचे 4 असे एकूण 44 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. खासगी शाळांमध्ये पाचवीत जैन इंग्लिश स्कूलचे 6, आदर्श विद्या मंदिरचे 2, न्यू इंग्लिश स्कूल व ओक्झेलीयम स्कूलचे प्रत्येकी 1 तसेच आठवीत एकवीरा विद्या मंदिरचे 3, जैन स्कूल व सरस्वती विद्यालयाचे प्रत्येकी 2, न्यू इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, कृष्णराव भेगडे विद्यालय, आदर्श विद्या मंदिर, अण्णासाहेब चोबे विद्यालय व प्रगती विद्या मंदिर या शाळांचे प्रत्येकी 1 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मावळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वारंवार कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. शब्दतरंग, प्रश्नपत्रिका सोडवणे, यशोदीप प्रश्नसंच असे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यादृष्टीने शिक्षकांनी स्वयंप्रेणेने प्रयत्न करावेत यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे सुधारणा झाल्याचे दिसत असून, पुढील परीक्षेत तालुक्यातील किमान 100 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

– सुदाम वाळुंज,गटशिक्षणाधिकारी, मावळ

हेही वाचा:

मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी येथे दरड कोसळली; ३ तास वाहतूक राहणार बंद

पुणे : देशभरातील संस्थेच्या जागा पदाधिकार्‍यांच्या ताब्यातच!

पुणे : ‘त्यांना’ भेटले चौघे बुरखाधारी; दहशतवाद्यांच्या चौकशीत नवीन माहिती उघड

 

Back to top button