पुणे रेल्वेस्थानकावर ‘तेजस स्क्वॉड’ | पुढारी

पुणे रेल्वेस्थानकावर 'तेजस स्क्वॉड'

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वेस्थानकावरील वाढत्या फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी दोन तिकीट तपासणीस, 2 आरपीएफ आणि 2 जीआरपी कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे नाव प्रशासनाने ’तेजस स्क्वॉड’ असे ठेवले असून, हे पथक फुकट्यांसह अनधिकृतरीत्या घडणार्‍या गोष्टींना रोखणार आहे.

पुणे रेल्वेस्थानक परिसरात होणार्‍या अनुचित घटना रोखण्यासाठी, फुकट्यांवर चाप बसविण्यासाठी, महिला आणि मुलांची सुरक्षा वाढविण्यासाठी, रेल्वे, जीआरपी (लोहमार्ग पोलिस) आणि आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामुळे आगामी काळात येथील अनधिकृत गोष्टींना रोखण्यात प्रशासनाला यश येण्याची शक्यता आहे.

पुणे रेल्वेस्थानक परिसरातील अनधिकृत कामांना आळा घालण्यासाठी तसेच पुणे स्थानकातून विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी तिकिट निरीक्षक, आरपीएफ आणि जीआरपी कर्मचार्‍यांसह ‘तेजस स्क्वॉड’ या नव्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे तिकिटांच्या महसुलात वाढ तर होईलच, शिवाय पुणे स्थानकातील अनधिकृत आणि बेकायदा कारवाया कमी होण्यास ही मदत होणार आहे.

हेही वाचा : 

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचा सत्कार

अहमदनगर : दुहेरी हत्याकांडातील सहा आरोपी जेरबंद

 

 

Back to top button