आंबेगावच्या पूर्व भागात फुलले झेंडूचे मळे | पुढारी

आंबेगावच्या पूर्व भागात फुलले झेंडूचे मळे

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झेंडूचे मळे आता फुलले आहेत. पुढील काळात विविध सण साजरे होणार आहेत. त्यामुळे झेंडूला बाजारभावाची चांगली साथ मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी झेंडूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदा उन्हाळी हंगामात अनेक शेतकर्‍यांनी झेंडूचे पीक घेतले. परंतु बाजारभावाची साथ मिळालीच नाही. यात्रा हंगाम आणि त्यानंतर लग्नसराईच्या हंगामातदेखील झेंडूच्या फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही.

झेंडूच्या पिकासाठी गुंतवलेले भांडवल शेतकर्‍यांच्या अंगावर आले. अनेक शेतकर्‍यांनी झेंडूच्या बागा उपटून टाकल्या. आता पुन्हा नव्याने झेंडूच्या बागा बहरल्या आहेत. श्रावण महिना सुरू झाल्याने विविध सण साजरे होणार आहेत. या सणांना फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. त्यामुळे आगामी काळात झेंडूच्या फुलांना बाजारभावाची चांगली साथ मिळेल, असे झेंडू उत्पादक शेतकरी सांगत आहेत. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्सव, दसरा अगदी दिवाळीच्या सणापर्यंत झेंडूच्या फुलांना बाजारभाव निश्चित चांगला मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

Back to top button