पुणे : सबलीजधारकांना मिळतात नोटिसा ! ’सर्व्हन्ट्स’चा नवा प्रताप आला समोर | पुढारी

पुणे : सबलीजधारकांना मिळतात नोटिसा ! ’सर्व्हन्ट्स’चा नवा प्रताप आला समोर

दिनेश गुप्ता :

पुणे : पुण्यातील सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी ज्या जागेवर वसलेली आहे, ती जागा शिरोळे कुटुंबीयांनी संस्थेला लीजवर दिलेली आहे. असे असतानाही संस्थेने नियमबाह्य पद्धतीने ती जागा सबलीज करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सबलीजच्या या प्रकाराची माहिती प्रदीर्घ काळ संस्थेच्या इतर सदस्यांपासून लपवून ठेवण्यात आली होती. मात्र, सबलीजच्या आधारे त्या जागेचा ताबा असलेल्या काही लोकांना मूळ मालक असलेल्या शिरोळे यांच्याकडून नोटीस देण्यात आली तेव्हा हा खेळ उजेडात आला.

भाडे देत असतानाही नोटीस का दिली? याची विचारणा सबलीजने जागा वापरणार्‍यांनी केली असता संस्थेच्या एकाही पदाधिकार्‍यास उत्तर देता आले नाही. देशात नाव असलेल्या संस्थेची बदनामी टाळण्यासाठी अ‍ॅड. गानू यांनी संस्थेला मदत केली. मात्र, संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांनी ते प्रकरण स्वतःच्या बहिणीकडे म्हणजेच अ‍ॅड. रश्मी सावंत यांच्याकडे सोपविले. मात्र, त्यांनी केलेल्या या कृत्याची खबर संस्थेला कळू दिली नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खरी परिस्थिती समजावी, यासाठी नागपूर शाखेचे आर. व्ही. नेवे यांनी चौकशीसाठी सहायक सचिव प्रवीणकुमार राऊत यांना देशमुख यांच्याकडे पाठविले.

इथेच रचला दूर करण्याचा डाव
प्रवीणकुमार राऊत यांनी संस्थेतील कामकाजाची माहिती घेतली, तर आपले सर्व कारनामे बाहेर येतील, असे देशमुख यांना वाटू लागले. मग त्यांनी नवी खेळी करीत अध्यक्षांना प्रवीण राऊत यांच्याबद्दल चुकीची माहिती पुरवत ते आपल्यासाठी धोकादायक ठरतील, असे पटवून दिले. तसेच कायदेशीर माहिती बहिणीकडे, तर प्रशासकीय माहिती मुलाकडे ठेवून इतर सदस्यांना याची खबर लागणार नाही, याची खबरदारी देशमुख यांनी घेतली. मात्र, नेवे यांना देशमुख यांचे चुकीचे कृत्य समजल्यावर डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी देशमुख यांना पत्र पाठवून यापुढे आपण आपल्याला कोणत्याही कृत्यात मदत करणार नसल्याचे कळविले. सबलीजवर असलेल्या जागेतील धारकांना मिळालेल्या नोटिशीचा विषय आजही गुलदस्तात आहे.

Back to top button