आता प्रादेशिक भाषेत सादर करता येणार प्रबंध | पुढारी

आता प्रादेशिक भाषेत सादर करता येणार प्रबंध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरी व ग्रामीण भागामधील अनेक शिक्षक प्रयोगशील उपक्रम राबवितात; मात्र त्यांचे हे संशोधन त्यांना लिखित स्वरूपात मांडायचे असल्यास ते इंग्रजी भाषेतूनच सादर करावे लागतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक काम समाजासमोर येत नाही. यासाठी शिक्षकांना त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये लिहून प्रकल्प सादर करता यावेत, यासाठी विहान अनुसंधान उपक्रम राबविण्यात येत आहे. काही शिक्षक हे खूप वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशा प्रयोगशील शिक्षकवर्ग अध्यापनात समोर येणार्‍या समस्यांना उत्तर शोधणे आणि त्या उत्तरातून विद्यार्थ्यांना शिक्षित करणे याविषयी सतत जागरूक असतात.

उपक्रम राबवणे व समस्या सोडवणे हे कार्य आपण अखंड करीत आहात. या आपल्या कामाला शास्त्रीय संशोधनाची जोड मिळावी आणि शिक्षकांनी केलेले उपक्रम, शोधलेली उत्तरे, विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती, अध्ययन निष्पत्ती या सगळ्या घटकांना शास्त्रीय संशोधनाची जोड देण्यासाठी सुपर माईंड या सामाजिक संस्थेतर्फे ‘विहान क्षेत्र संशोधन’ हा उपक्रम राज्यभरात राबविला जाणार आहे. संस्थेबरोबर एज्युबोध ही संस्था शैक्षणिक सल्लागार म्हणून या उपक्रमामध्ये सलग्न आहे.

शिक्षिकांकडून मागविणार प्रयोगशील व्हिडीओ
या उपक्रमात शिक्षकांकडून काही व्हिडीओ मागविले जाणार आहेत. ते नेमके कसे शिकवतात. एखाद्या शिक्षक तो विषयाचे अध्यापन करताना उदाहरणासह कसा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवितो किंवा काय तंत्रज्ञान व मूलभूत संकल्पना वापरून शिकवितो. याचे व्हिडीओ मागविले जाणार आहेत. यामधून प्रयोगशील असे 150 व्हिडीओ निवडले जाणार आहेत. अशा शिक्षकांना इंग्रजी भाषेतून शोधनिबंध सादर करण्यास अडचणी येतात. यासाठी या उपक्रमात प्रबंध प्रादेशिक भाषेत कसा लिहायचा हे शिकविले जाणार आहे.

विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या उपक्रमामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देताना पुणे, मुंबई व नाशिक येथील विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर शिक्षक त्यांचे अनुसंधान (प्रबंध) तयार करतील. त्यानंतर अध्यपन करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा करण्यात येतील. ज्या शिक्षकांनी यशस्वी प्रयोग केले आहेत. त्याची दखल केंद्रीय पातळीवर घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बालवाडी ते तिसरीच्या शिक्षणावर जास्त भर
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) नुसार मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) वाढीच्या दृष्टीने उपक्रम राबविला जात आहे. बालवाडी ते 3 री या वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर जास्त भर दिला जाणार आहे. हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे हा याचा उद्देश आहे.

‘विहान’ उपक्रमाची माहिती मला मिळाली. गेली 15 वर्षे मी बालवाडी शिक्षिका म्हणून काम करत आहे. हे करताना अनेक कौशल्यांचा वापर करावा लागतो; तसेच वेगवेगळे अनुभव येतात. या अनुभवांना ‘विहान’ च्या माध्यमातून अनुसंधानची जोड देण्याची संधी उपलब्ध होत आहे, याचा खूप आनंद वाटतोय. त्यातून मला हे लिखाण मराठीतूनच द्यायचे आहे. त्यामुळे व्यक्त होणे सोपे जाणार आहे.
                                                       -वैशाली तिडके, बालवाडी शिक्षिका

शालेय स्तरावरती दैनंदिन अध्यापन प्रक्रियेमधील शिक्षक अत्यंत प्रयोगशील असतात. त्यांच्या कौशल्यपूर्ण अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेमध्ये व शैक्षणिक पातळीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येत असतो. यासाठीच या शिक्षकांद्वारे संशोधनपर अभ्यास ‘विहान – अनुसंधान’ या उपक्रमाद्वारे सहज शक्य होणार आहे. सदर अभ्यास शिक्षकांना मराठी किंवा हिंदीमध्ये करून देण्याचे असल्यामुळे शिक्षक अत्यंत प्रोत्साहित होऊन सहभागी होत आहेत.
                                    -मंजुषा वैद्य, संचालिका, सुपरमाईंड फाउंडेशन

Back to top button