शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: दूध दर निश्चित समितीने केलेली शिफारस राज्‍य सरकारने स्वीकारली, विखे पाटलांची माहिती; आता दुधाला मिळणार ‘एवढा’ भाव | पुढारी

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: दूध दर निश्चित समितीने केलेली शिफारस राज्‍य सरकारने स्वीकारली, विखे पाटलांची माहिती; आता दुधाला मिळणार 'एवढा' भाव

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना ३४ रुपये दर देण्‍याबाबत दूध दर निश्चित समितीने केलेली शिफारस राज्‍य सरकारने स्विकारली असून, राज्‍यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघानी दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना ३४ रुपये दर देण्‍याबाबतच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करुन हे सरकार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्‍याचा संदेश दिला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

तालुक्‍यातील जोर्वे येथे भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या महा जनसंपर्क अभियानात मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्‍थ आणि युवकांशी संवाद साधून केंद्र व राज्‍य सरकारच्‍या योजनांची माहीती दिली. याप्रसंगी भाऊसाहेब इंगळे, जोर्वेच्या सरपंच प्रिती दिघे, प्रवरा बॅकेचे व्‍हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, शरद थोरात, शिवाजी कोल्‍हे, राहुल दिघे, गोकूळ दिघे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धिरज मांजरे, गटविकास आधिकारी अनिल नागणे, उपविभागीय कृषि आधिकारी विलास गायकवाड यांच्‍यासह विविध विभागांचे आधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, अडचणींचा सामना करणाऱ्या दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याची भूमिका राज्‍य सरकारची होती. यासाठी राज्‍यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्‍या प्रतिनिधींची बैठक घेऊन समिती गठीत करण्‍यात आली होती. या समितीने ३४ रुपये दर देण्‍याची शिफारस केली. त्‍यानुसार राज्‍य सरकारने आता गाईच्‍या दूधाकरीता किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्‍याचा शासन आदेश काढला असून, याची अंमलबजावणी करण्‍याबाबतही सुचित करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. दर ३ महि‍न्‍यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्‍याबाबतही या आदेशात सुचित करण्‍यात आले, असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

पशुखाद्य कंपन्‍यांना देखील खाद्याचे भाव कमी करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले असून, पशु खाद्याबाबत सरकारने आता गांभिर्याने काही निर्णय करण्‍याची भूमिका घेतली आहे. दूध उत्‍पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्‍यासाठी पशुखाद्यांमध्‍ये कोणते घट‍क आहेत, याची सविस्‍तर माहीती गोण्‍यांवर छापण्‍याच्‍या सुचना कंपन्‍यांना देण्‍यात आल्‍या असून, याची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा त्‍यांनी दिला. दूध भेसळ रोखण्‍यासाठीही कठोर पाऊल आता शासनाने टाकली असून, यासाठी पोलिस, पशुसंवर्ध विभाग आणि अन्‍न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांची जिल्‍हास्‍तरावर समिती गठीत करण्‍यात आली आहे. दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्‍का कायद्यान्‍वये कारवाई करण्‍याची शिफारस करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा:

संगमनेर पोलिसांकडून महिलांच्या वेशातील विदर्भातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

संगमनेर : बिबट्याचे अवयव विक्री; एक अटक

लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात

 

 

Back to top button