संगमनेर पोलिसांकडून महिलांच्या वेशातील विदर्भातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद | पुढारी

संगमनेर पोलिसांकडून महिलांच्या वेशातील विदर्भातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: महिलांचा वेश परिधान करुन भर रस्त्यामध्ये वाहने अडवून त्यांना लुटणाऱ्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. त्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी दरोड्याच्या साहित्यासह चारचाकी वाहन असा सुमारे २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पत्रकार परिष देत दिली.

संगमनेर शहरातील पावबाकी रस्त्या जवळील एका उपनगरात बुधवारी मध्य रात्री चार वाजण्याच्या सुमारास एका दुकानामध्ये तरुणी पाहून तृतीय पंथीयांचा वेश परिधान केलेले दोघेजण घुसले. त्यांनी त्या तरुणीकडे पैसे मागितले. तिने पैसे दिल्यानंतर त्यांनी तिला तिच्या कानातील दागिने काढण्यास सांगितले. त्यामुळे तिला संशय आला. तिने आरडाओरडा केला अन त्या तृतीयपंथीयांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेत तिने थेट ११२ नंबरला फोन लावून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसाचे नाकाबंदी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पो.हे. कॉ. विजय खाडे, पोना. विजय पवार, पो. कॉ.विशाल कर्पे, रोहिदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्मराम पवार यांच्या पथकाने २०० मीटर पाठलाग करत त्या सहाही दरोडेखोरांना पकडले आणि वाहनासह त्यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी पकडलेल्या या दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गज, चार चाकी वाहन, लोंखडी कडे, साडी व मिरची पूड तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ८३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पो. कॉ. विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय मारुती शिंदे (वय 25, रा.चिसखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि बुलढाणा), सुनील बाबुराव सावंत (वय ३२ रा.टाकळी तलाव, ता. खामगाव, जि.बुलढाणा), राजेश शंकर शेगर (वय 25, रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा), साजन शिवलाल चव्हाण (वय 25, रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि किशोर महादेव इंगळे (वय 21, रा. टाकळी तलाव, पो. ढोरप गाव, ता. खामगाव जि. बुलढाणा) या सहा जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे

मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी सतर्क झालेली होती. त्यामुळे गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टू प्लसमधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी व पेट्रोलिंग करणे अशा प्रकारच्या समांतर कारवाया चालू होत्या. परंतु, पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नसलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्यात पथकाने ही दरोडेखोर पकडण्याची धडक कारवाई केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा:

लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात

राहुरी पोलिसांकडून रोडरोमिओंवर कारवाई

नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकाराचा जगात डंका !

 

Back to top button