पुणे : घरगुती लहान व्यवसायांवर गंडांतर? मिळकतीच्या वापरातील बदलावर आता नजर | पुढारी

पुणे : घरगुती लहान व्यवसायांवर गंडांतर? मिळकतीच्या वापरातील बदलावर आता नजर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मिळकतीच्या वापरातील बदल शोधण्यासाठी महापालिकेने वॉररूम तयार केली असून, तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेने 8308059999 हा मोबाईल क्रमांक जारी केला आहे. वापरातील बदलासंदर्भात या मोबाईल क्रमांकावर तक्रार करणार्‍यांचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती स्वरूपाच्या लहान लहान व्यवसायांवर गंडांतर येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात नव्याने अस्तित्वात येणार्‍या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा इत्यादी मिळकती तसेच वापरात बदल होणार्‍या मिळकतींची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार त्या-त्या वर्षांच्या प्रचलित दरसूचीनुसार आकारणी करून संबंधित मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्यात येते.

निवासी मिळकतींचा पुढे वापरात बदल केला जातो. परंतु, त्याची नोंद बांधकाम विभाग किंवा मिळकत कर विभागाला कळविली जात नाही. अशा मिळकती शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि तिप्पट कर लावण्यात येतो. निवासी मिळकतींमध्ये बिगरनिवासी व्यवसाय करून पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एक वॉररूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये गृहनिर्माण संकुलांमध्ये निवासी सदनिकेव्यतिरिक्त कार्यालयीन वापर, व्यावसायिक वापर उदा. : ऑफिस, ब्युटीपार्लर, क्लिनिक अथवा निवासी मिळकतीमध्ये अनधिकृत हॉटेलचा वापर सुरू असल्यास अथवा एखाद्या मिळकतीची कर आकारणी केली नसल्यास, अशा मिळकतींची माहिती संबंधित मोबाईल क्रमांकावर कळविल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाईल. संबंधित माहिती पुरविणारी व्यक्ती, तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे मिळकत कर आकारणी आणि संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागरिकांच्या तक्रारींची दखल
शहरामध्ये निवासी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. निवासी मिळकतीमध्ये बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता, वापरात बदल करून, अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट, बार, खानावळ इत्यादी व्यवसाय सुरू असून, रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत सुरू असतात. काही ठिकाणी कर्णकर्कश आवाजात स्पीकर सुरू असल्याने निवासी भागातील शांतता भंग होत आहे. तसेच या ठिकाणी येणार्‍या नागरिकांकडून अनेक वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्यामुळे पार्किंगचा तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात काही लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी देखील खात्याकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.

हे ही वाचा : 

यंदा अकरावीची बाके राहणार रिकामी; पॉलिटेक्निक, आयटीआय जोमात !

करिअरची दिशा आणि यशाचा राजमार्ग होणार सुकर

Back to top button