यंदा अकरावीची बाके राहणार रिकामी; पॉलिटेक्निक, आयटीआय जोमात ! | पुढारी

यंदा अकरावीची बाके राहणार रिकामी; पॉलिटेक्निक, आयटीआय जोमात !

गणेश खळदकर : 

पुणे : पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्य आणि तंत्रशिक्षणाकडे यंदा विद्यार्थ्यांचा ओढा सर्वाधिक आहे. त्यामुळेच तंत्रशिक्षण पदविका प्रवेशासाठी राज्यात 1 लाख 10 हजारांपेक्षा अधिक, तर आयटीआयसाठी 2 लाख 13 हजारांवर अर्ज कन्फर्म झाले आहेत. त्यामुळे यंदा पॉलिटेक्निक, आयटीआय जोमात, तर अकरावी प्रवेश कोमात आहे, त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा अकरावीची बाके जास्तच रिकामी राहणार असल्याचे दिसून येत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी दरवर्षी अकरावी, तंत्रशिक्षण पदविका आणि आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करत असतात.

गेली दोन-तीन वर्षे विद्यार्थी पारंपरिक अकरावी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. कौशल्य आणि तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार तसेच नोकरीच्या विविध संधी निर्माण होत आहेत. त्यातुलनेत पारंपरिक अकरावी-बारावी करून नंतर पदवीचे शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना बेरोजगारीच्या समस्येला सामारे जावे लागत आहे.

अकरावी प्रवेशासाठी यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेशासाठी 1 लाख 14 हजार 350 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी केवळ 97 हजार 11 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. म्हणजेच नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने जरी अकरावीत प्रवेश घेतला तरी 17 हजारांवर जागा रिक्त राहतील. अकरावीसाठी नोंदणी केलेले सर्वच विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे 30 ते 35 हजार जागा दरवर्षी रिक्त राहत असल्याचे दिसून येते. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी यंदा 1 लाख 40 हजारांवर विद्यार्थ्यांनी राज्यात नोंदणी केली आहे. तर 1 लाख 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज कन्फर्म केले आहेत.

पुणे विभागात तर 31 हजार जागांसाठी 44 हजार 651 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी आतापर्यंत 2 लाख 32 हजार 284 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर 2 लाख 13 हजार 382 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज कन्फर्म केले आहेत. तंत्रशिक्षण पदविकेसाठी 7 जुलै तर आयटीआय प्रवेशासाठी 12 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा आयटीआय आणि तंत्रशिक्षण पदविकेसाठी जागांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. तर अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या कमी अर्ज आले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या अभ्यासक्रमांमधून देण्यात येत आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांना तंत्रशिक्षणाचे महत्त्व पटले आहे. रोजगारनिर्मितीसाठी पारंपरिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निक हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळेच यंदा विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त आले असून, आतापर्यंत 1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
                 – डॉ. विनोद मोहितकर, प्र. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी, आयटीआयमध्ये होत असलेले रोजगार मेळावे आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेला स्टायपेंड यामुळे आयटीआयकडे मोठ्या प्रमाणात ओढा वाढला आहे. सध्या रोजगारासाठी कौशल्याशिवाय पर्याय नाही. कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचादेखील सिंहाचा वाटा आहे. त्यांनी विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यास व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाला प्रोत्साहन दिले आहे.
        – डी. ए. दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय 

 

हे ही वाचा : 

सांगली : फेकून दिलं.. रोटर फिरवला.. दर वाढला

समरजित घाटगे यांनी घेतली फडणवीस यांची भेट

 

Back to top button