भामा-आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार ; पुण्यातील तीन तालुक्यांतील शेतकर्‍यांना लाभ | पुढारी

भामा-आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार ; पुण्यातील तीन तालुक्यांतील शेतकर्‍यांना लाभ

मुंबई /पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भीमा नदीच्या भामा या उपनदीवरील भामा-आसखेड पाटबंधारे प्रकल्पाचा उजवा व डावा हे दोन्ही कालवे रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे खेड, हवेली आणि दौंड तालुक्यातील 65 गावांमधील लोकांच्या शेतजमिनीवरील निर्बंध शिथिल होऊन शिक्के उठवण्यात येतील. याचा लाभ शेतकर्‍यांना मिळेल. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ज्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, अशांना नजीकच्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

भामा उपनदीवर करंजविहिरे येथे माती धरण बांधण्यात आले असून, या प्रकल्पाचा पाणी वापर 188.711 द.ल.घ.मी. इतका आहे. भामा-आसखेड धरणाचे काम पूर्ण झाले असून, 2010 पासून या धरणात पाणी साठा करण्यात येत आहे. मूळ प्रकल्पाच्या मंजुरीच्या वेळी सिंचनास प्रथम प्राधान्य दिले होते. मात्र, गेल्या पंचवीस वर्षात पुण्याच्या लोकसंख्येत वाढ झाल्याने, या प्रकल्पाचे एकूण 147.636 द.ल.घ.मी. सिंचनाचे पाणी बिगर सिंचनाकडे वळवून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच चाकणलगतच्या 19 गावांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या 23 हजार 110 हेक्टर लाभ क्षेत्रापैकी 19 हजार 645 हेक्टर लाभ क्षेत्र लाभधारकांच्या मागण्यांनुसार वगळण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्यांची कामे करणे किफायतशीर ठरणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

Ashadhi Ekadashi Mahapuja : अहमदनगरचे काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसह केली विठ्ठलाची महापूजा

Medical College : राज्यात 9 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

Back to top button