मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Medical College : राज्यातील आरोग्यव्यवस्थेत वेगाने वाढ करण्याच्या उद्देशाने एकूण नऊ जिल्ह्यांत नवीन शासकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जायका आणि आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार असून, त्यासाठी 4 हजार 365 कोटी 72 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत; तर पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. या नऊ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. तसेच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
Medical College : कोल्हापुरात सेंटर ऑफ एक्सलन्स
राज्यातील शासकीय, अशासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र-सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पुणे जिल्ह्यातील अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय आणि कोल्हापूरचे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येतील.
Medical College : दीनदयाळ अंत्योदय योजना राबविण्यास मान्यता
महाराष्ट्रातील 153 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना अर्थात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
हे ही वाचा :