पिंपरी : कचरा टाकण्याच्या वादातून एकाचा खून | पुढारी

पिंपरी : कचरा टाकण्याच्या वादातून एकाचा खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून एकाचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री घडली. याप्रकरणी अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. भास्कर लिंबाजी साळवे (54, रा. काळे कॉलनी, आळंदी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आशिष भास्कर साळवे (32) यांनी मंगळवारी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आपले वडील बेशुद्ध अवस्थेत भोसरी बैलगाडा घाटाजवळ पडले असल्याची माहिती फिर्यादी आशिष यांना मिळाली.

दरम्यान, त्यांनी घटनास्थळी पाहिले असता वडिलांच्या शर्टाचे बटण तुटलेले दिसले. तसेच, त्यांच्या डाव्या पायाला जखम, उजवा हात फ्रॅक्चर झाले असून कोणीतरी त्यांचा खून केल्याचे दिसून आले. त्यानुसार, त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोनजण लोखंडी रॉडने मारहाण करीत असल्याचे कैद झाले आहे. दरम्यान, त्यांनी आसपासच्या दुकानांमध्ये चौकशी केली असता एकजण लोखंडी रॉड घेऊन गेल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन जणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून भांडण झाल्यानंतर संशयितांनी आपसात संगनमत करून हे कृत्य केल्याचे समोर
आले आहे.

हे ही वाचा : 

पुणे : बिपरजॉयमुळे गुजराती जांभळे बाजारातून गायब ; किलोमागे 20 ते 40 रुपये वाढ 

पुणे : डॉ. रामोड प्रकरणात ‘ईडी’ची एन्ट्री?

Back to top button