पुणे : बिपरजॉयमुळे गुजराती जांभळे बाजारातून गायब ; किलोमागे 20 ते 40 रुपये वाढ | पुढारी

पुणे : बिपरजॉयमुळे गुजराती जांभळे बाजारातून गायब ; किलोमागे 20 ते 40 रुपये वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :   गुजरातमधील जांभूळ उत्पादक क्षेत्राला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बाजारात या जांभळांची आवक ठप्प झाली आहे. बाजारात पुणे विभागासह कर्नाटकातून जांभळे दाखल होत आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने गत वर्षीच्या तुलनेत जांभळांच्या भावात किलोमागे वीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जांभळांची 80 ते 140 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डात दरवर्षी राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून जांभळांची आवक होते. या काळात जांभळांना मागणीही वाढून त्यांना चांगले दर मिळतात. सुरुवातीच्या टप्प्यात पुणे विभागातून चांगल्या प्रमाणात जांभळे बाजारात दाखल होत होती. मात्र, त्यामध्ये खंड पडला. त्यानंतर कर्नाटकातून जांभळांची आवक सुरू झाली. या जांभळांवर खड्डे पडल्याने त्याच्या दर्जात मोठी घसरण झाली होती. पुणे विभागातून अपेक्षित आवक न झाल्याने ग्राहकांचा नाइलाजास्तव या जांभळांच्या खरेदीकडे कल वाढला. दरम्यान, गुजराती जांभळांची आवक सुरू झाली. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळाने तडाखा दिल्याने येथून होणारी आवकही ठप्प झाल्याने कर्नाटक भागासह पुणे विभागातील जांभळांना चांगलाच भाव आला आहे.

सद्य:स्थितीत बाजारात पुणे विभागातून दुसर्‍या व तिसर्‍या बहरातील जांभळांसह कर्नाटकातूनही जांभळे दाखल होत आहेत. कर्नाटकी जांभळे ही आकाराने मोठी, गरदार व चवीला गोड असल्याने दर्जा घसरूनही चांगलाच भाव खाऊ लागली आहेत.
मार्केट यार्डातील फळबाजारात 11 ते 13 किलोच्या डागांमधून कर्नाटक जांभळांची दररोज 175 ते 200 डाग इतकी आवक होत आहे. तर, पुणे विभागातून 10 ते 15 किलोचे 40 ते 50 डाग बाजारात दाखल होत आहेत. एरवीच्या तुलनेत ही आवक कमी आहे.
गतवर्षी घाऊक बाजारात या जांभळांच्या दहा किलोला 600 ते 1000 रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यंदा तो 200 ते 400 रुपयांनी वाढून 800 ते 1400 रुपयांपर्यंत पोहचल्याची माहिती जांभळाचे व्यापारी शिवाजी भोसले यांनी दिली.

Back to top button