वालचंदनगर : डाळिंब बागांना क्रॉप कव्हरने नवसंजीवनी | पुढारी

वालचंदनगर : डाळिंब बागांना क्रॉप कव्हरने नवसंजीवनी

धनंजय थोरात

वालचंदनगर(पुणे) : गेल्या चार ते पाच वर्षांत डांबर्‍या व तेल्या रोगाने त्रासलेल्या इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर बागा काढून टाकल्या होत्या. मात्र, तालुक्यातील काही प्रगतशील शेतकर्‍यांनी डाळिंब बागेत नवनवीन प्रयोग करून पुन्हा यशस्वी उत्पादन घेतले. आता पुन्हा डाळिंब उत्पादकांनी कंबर कसली असून, बहुतांश शेतकरी डाळिंब बागेला क्रॉप कव्हर (कागदी आच्छादन) करीत आहेत. हे क्रॉप कव्हर डाळिंब पिकाला नवसंजीवनी ठरत आहे.

सन 2010 च्या दशकामध्ये इंदापूर तालुका पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब उत्पादनात अग्रेसर राहिला होता. मात्र, अतिरिक्त रासायनिक खते व फवारण्यांमुळे या भागात डाळिंब पिकांवर विविध रोगराई उद्भवली होती. त्यामध्ये प्रामुख्याने तेल्या व डांबर्‍या या रोगांचा जास्त प्रादुर्भाव झाला होता. मात्र, या तालुक्यातील काही प्रगतशील शेतकर्‍यांनी निरोगी डाळिंब उत्पादनासाठी शेतीत नवनवीन प्रयोग केले. त्यामध्ये सेंद्रिय खते, अत्यल्प रासायनिक फवारण्या, शेण खताचा वापर, क्रॉप कव्हरचा वापर व योग्य पाणी व्यवस्थापन या गोष्टींना महत्व दिले. त्यामुळे पुन्हा तालुक्यातील डाळिंब पिकावरील रोगराईचे प्रमाण कमी झाले.

याच प्रेरणेतून तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांनी नव्याने डाळिंब लागवडी केल्याचे पाहायला मिळत असून छोटे शेतकरीही आपल्या डाळिंब बागेत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने क्रॉप कव्हरचा पिकाला मोठा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. क्रॉप कव्हरमुळे पिकाचे उन्हापासून संरक्षण होत असून उन्हाळ्यात असलेल्या तापमानापेक्षा किमान 7 डिग्री अंश सेल्सिअस तापमान कमी राहत आहे. साहजिकच फळावर उन्हामुळे येणारा चट्टा रोखला जात आहे.

प्रामुख्याने उन्हाची तीव—ता रोखली जात असल्याने जमिनीची धूप कमी होत असून तेल्या रोगासाठी प्रतिरोधक वातावरण बनत आहे. शिवाय हवेतून येणारी धूळ व जीवजंतू यांचा फळाशी संपर्क रोखला जात असल्याने फळाची गुणवत्ता वाढत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. क्रॉप कव्हरमुळे डाळिंब फळाची गुणवत्ता चांगली राहिल्याने बाजारात डाळिंबाला भाव आहे.

प्लास्टीकपेक्षा क्रॉप कव्हर उत्तम

डाळिंब बागेत एका पिकाला चालणारे क्रॉप कव्हर बसविण्यास एकरी 20 हजार रुपये खर्च येतो, तर दोन वर्ष चालणारे प्लास्टिक आच्छादन करण्यासाठी किमान एकरी 65 हजार रुपये खर्च येतो; मात्र यामध्ये प्लास्टिक आच्छादनापेक्षा क्रॉप कव्हर शेतकर्‍यांना जास्तीचे फायदेशीर ठरत असल्याचे तज्ञांचे मत आहे. कारण प्लास्टिक आच्छादनात उन्हाची तीव—ता अपेक्षित प्रमाणात रोखली जात नसून बागेतील हवामान दमट राहत असल्याने त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती असल्याचे मत आहे.

हेही वाचा

पुणे : कळंब येथील शेतकर्‍यांना पहाटे बिबट्याचे दर्शन

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दुसऱ्यांदा केलं बेबी बंप फ्लॉंट

बारामती : पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्या ! शेतकरी पाहताहेत चातकाप्रमाणे पावसाची वाट

Back to top button