बारामती : पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्या ! शेतकरी पाहताहेत चातकाप्रमाणे पावसाची वाट | पुढारी

बारामती : पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्या ! शेतकरी पाहताहेत चातकाप्रमाणे पावसाची वाट

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जून निम्मा संपला, तरी तालुक्यात एकही पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात उन्हाचा कहर सुरू असून, घामांच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत असून, सायंकाळी सुटणा-या वार्‍याने पावसाची दिशा बदलली आहे. पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

मे महिन्यातही अवकाळीने बारामतीला हुलकावणी दिली होती. जूनमध्ये वेळेत पाऊस पडेल, अशी आशा असलेल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाऊस लांबल्याने पाणी आले आहे. तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस झाला नसल्याने बाजरी, सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये आदींच्या पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री सोपानकाका पालखी सोहळा कोरडाच गेला. पाऊस नसल्याने अनेकांची वारीही यंदा चुकली. अनेक शेतकरी पाऊस झाल्यानंतर पेरण्या करून वारीला जातात. मात्र, बारामतीत पावसाचा पत्ता नाही.

बारामती तालुक्याला वरदान ठरलेल्या वीर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, शेतकर्‍यांची भिस्त आता पावसावर आहे. पालखी सोहळा संपताच कालव्याचे आवर्तन बंद होणार असल्याने पिके कशी जगवायची असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे. शेतीसह, जनावरांच्या पाण्याचा, चार्‍याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. दरवर्षी वेळेवर दाखल होणारा पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पाऊस झाला नाही तर पेरण्या कशा करणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

निरा खोर्‍यातील धरण क्षेत्रातही पाऊस नाही

बारामती तालुक्यातील शेतकरी निरा डावा कालवा व निरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. निरा खो-यातील गुंजवणी, निरा देवघर, भाटघर आणि वीर धरण क्षेत्रातही पावसाने दडी मारली आहे. त्यात या धरणांतून निरा डावा कालव्याला मिळणा-या पाण्याचा हिस्सा संपत आला आहे. सध्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. परंतु पालखी निमगाव केतकीतून पुढे गेल्यावर कालवा बंद होण्याची शक्यता आहे. या स्थितीत पिके जळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा

पारनेर : सायकलवरून एका दिवसात गाठले पंढरपूर

परभणी : जिंतूरमधील मौजे माणकेश्वर येथे गाळ काढताना सापडले हेमाडपंती मंदिर

पुणे : कळंब येथील शेतकर्‍यांना पहाटे बिबट्याचे दर्शन

Back to top button