Ashadhi Wari 2023 : सणसरमध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी | पुढारी

Ashadhi Wari 2023 : सणसरमध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा :  जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि. 19) सायंकाळी सणसर (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने मुक्कामाची जय्यत तयारी केली असल्याची माहिती सरपंच पार्थ निंबाळकर यांनी दिली. निंबाळकर म्हणाले, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी सणसर, भवानीनगर परिसरामध्ये संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. पालखी सोहळा सोमवारी (दि. 19) मुक्कामासाठी सणसरमध्ये विसावणार आहे. त्यामुळे वारकर्‍यांसाठी आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालखीचा रथ उभा करण्यासाठी पालखीतळावरील मल्टीपर्पज हॉलसमोर मंडप बांधण्यात आला आहे.

पालखीतळावर संपूर्ण मुरमीकरण करून रोलरने सपाटीकरण करण्यात आले आहे. वारकर्‍यांसाठी एक हजार फिरत्या शौचालयांचे नियोजन करण्यात आलेले आहे. भाविकांच्या दर्शन रांगेसाठी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. यामध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा करण्यात आल्या आहेत. पालखीतळावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. दोन ठिकाणी हायमास्ट दिवे बसविले आहेत. या वेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, विस्तार अधिकारी प्रशांत बगाडे, महादेव पोटफोडे, तलाठी गोरख बारवकर यांच्यासह इतर गावांतील तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.

पहिल्या गोल रिंगणासाठी बेलवाडी सज्ज
सणसर येथील मुक्कामानंतर मंगळवारी (दि. 20) सकाळी बेलवाडी येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण होणार आहे. या ठिकाणी रिंगण परिसरात स्वच्छता करण्यात आलेली आहे. रिंगण परिसराला बॅरेकेडिंग करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

नाशिक : कानडे मारुती लेनमध्ये टेस्टिंग लॅबला आग

निर्यातक्षम कांद्याच्या संशोधनाची गरज ! माजी कुलगुरू डॉ. लवांडे यांचे मत

Back to top button