बिल्डरला पालिकेचा दणका ! नदीपात्रात राडारोडा टाकणारा ट्रक जप्त | पुढारी

बिल्डरला पालिकेचा दणका ! नदीपात्रात राडारोडा टाकणारा ट्रक जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  झेड ब्रिजखाली दिवसाढवळ्या नदीपात्रात बांधकामाचा राडारोडा टाकणार्‍या बिल्डरला महापालिकेने दणका दिला आहे. संबंधित बिल्डरचे एरंडवणे येथील बांधकाम थांबविण्याची नोटीस महापालिकेने बजावली असून, राडारोडा टाकणारा ट्रकही जप्त केला आहे.  शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच खासगी घरे व बंगल्यांची कामेही सुरू आहेत. आपला राडारोडा महापालिकेच्या वाघोलीतील ’सी अँड डी’ प्रकल्पात टाकू, असे लेखी आश्वासन बांधकाम व्यावसायिक परवानगीच्या वेळी देतात. मात्र, बांधकामातील टाकाऊ साहित्य नदी, नाले, ओढे, तळी यांच्या काठांवर टाकण्यात येतो. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांची मोठ्या प्रमाणात हानी होते.
हे प्रकार थांबण्यासाठी महापालिका दंडासह इतर कायदेशीर कारवाई करते. तरीही अनेकजण महापालिकेच्या यंत्रणेची नजर चुकवून नदीपात्रात राडारोडा टाकतात. दरम्यान, नारायण पेठेच्या बाजूने झेड ब्रिजखाली राडारोडा आणून टाकला जात असल्याचा प्रकार नुकताच समोर आला. याबाबत महापालिकेला समजल्यानंतर राडारोडा टाकणारा ट्रक जप्त करण्यात आला. तसेच संबंधित बिल्डरने बांधकाम नियमावलीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने पुढील आदेशापर्यंत त्याचे एरंडवणा येथील बांधकाम थांबविण्याचे आदेश पालिकेने दिले.
नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. संबंधित बिल्डरच्या बांधकाम साईटवरील काम स्थगित करण्याची नोटीस दिली आहे. तसेच राडारोडा टाकणारा ट्रकदेखील जप्त करण्यात आला आहे.  
                                                                   – प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, बांधकाम विभाग.

Back to top button