कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करा : खा. डॉ. अमोल कोल्हे | पुढारी

कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करा : खा. डॉ. अमोल कोल्हे

कात्रज (पुणे) : वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच पाहणी केली. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला दिल्या. तसेच कात्रज-कोंढवा रस्ता भूसंपादनातील अडचणींची त्यांनी माहिती घेतली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंंजय चौक, गोकुळनगर चौक, कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची डॉ. कोल्हे व आमदार चेतन तुपे यांनी नुकतीच पाहणी केली.

डॉ. कोल्हे म्हणाले की, ‘दक्षिण पुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राद्वारे 30 एमएलटी वाढीव पुरवठा व भिलारेवाडी पाझर तलाव रुंदीकरण ही कामे प्राधान्याने करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न लवकर लवकर सुटणार आहे.’ या वेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, नमेश बाबर, प्रतीक कदम, बाळा कवडे आदींसह कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जनता दरबारात मांडले विविध प्रश्न

कात्रज विकास आघाडीचे प्रमुख नमेश बाबर यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या वेळी कात्रजसह नव्याने समाविष्ट केलेल्या गावांतील पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, प्रसूतिगृह, क्रीडांगणांची वणवा, नवे विद्युत उपकेंद्र, समाविष्ट गावांतील मूलभूत सुविधा, आरक्षणे, कायदा-सुव्यवस्था आदींबाबत प्रश्न मांडले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात माजी नगरसेविका अमृता बाबर यांनी कात्रजच्या समस्यांचा व प्रशासनाच्या उदासीनतेचा पाढा वाचला. आमदार चेतन तुपे, संजय जगताप, योगेश टिळेकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध; एका परदेशी नागरिकासह चौघांना अटक

पुणे-पानशेत रस्ता खचला ! पावसाळ्यात तब्बल 60 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Back to top button