पुणे-पानशेत रस्ता खचला ! पावसाळ्यात तब्बल 60 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

पुणे-पानशेत रस्ता खचला ! पावसाळ्यात तब्बल 60 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांसह नागरिकांची नेहमी वर्दळ असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण परिसरात सोनापूरजवळ खचलेल्या पुलाचे व रस्त्याचे काम रखडले आहे. सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करूनही ही कामे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता वाहून जाऊन पानशेत भागातील वेल्हे, हवेली व मुळशी या तीन तालुक्यांतील सुमारे 60 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

डोंगर उतारापासून धरणतीरापर्यंत रस्त्याचा मोठा भाग पुलासह खचला आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने रस्ता पुन्हा खचून वाहतूक धोकादायक झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने येथे एकेरी वाहतूक सुरू केली आहे. पर्यटकांसह हजारो नागरिकांना येथून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. खचलेल्या रस्त्याला भेगा व खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. खडकवासला धरणातील पाण्याच्या लाटा आदळत असल्याने पाणलोट क्षेत्रालगतचा रस्ता निम्म्याहून अधिक खचला आहे.

आंबेगाव खुर्दचे उपसरपंच राजू कडू म्हणाले, 'या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिक व पर्यटकांना भीती वाटत आहे. पुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेच्या लालफितीमुळे अद्यापही हे काम सुरू झाले नाही.' जिल्हा काँग्रेसच्या सहकार विभागाचे अध्यक्ष लहू निवंगुणे म्हणाले की, सोनापूर ते रुळेपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला डोंगर व दुसर्‍या बाजूला धरण आहे. या ठिकाणी पर्यायी रस्ता करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे प्रशासनाने धोकादायक ठिकाणी 24 तास सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी.

या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया प्रशासनाने तातडीने पूर्ण कराव्यात तसेच काम सुरू होईपर्यंत पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

– भीमराव तापकीर,
आमदार

या महिनाअखेरीस निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक खबरदारी घेतली जात असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

– अमोल पवार,
कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news