पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : पालख्यांच्या आगमनामुळे वाहतुकीमध्ये बदल | पुढारी

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : पालख्यांच्या आगमनामुळे वाहतुकीमध्ये बदल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 12 जून रोजी पुण्यात दाखल होत आहेत. त्यामुळे पालखी मार्गावरील रस्ते दुपारी दोनपासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचा मार्ग विठ्ठल मंदिर आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस पूल, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक असा असेल. या मार्गावरील वाहने पहाटे दोनपासून बंद केली जाणार आहेत. तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आगमन मार्ग हा आळंदी येथून पालखी निघून वडमुखवाडी, चर्‍होली फाटा, दिघी मॅगझीन, बोपखेल फाटा, कळस ओढा, विश्रांतवाडी, फुले नगर, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक असा असेल. या मार्गावरील रस्ते पहाटे आवश्यतेनुसार बंद केले जाणार आहेत.

शहरात अगमन झाल्यानंतर दोन्ही पालख्यांचा मार्गच एकच असणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, गुडलक चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय टॉकीज चौक, बेलबाग चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलिस चौकी येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्काम करेल. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौक मार्गे पालखी विठोबा मंदिर येथे जाऊन मुक्काम करेल. या मार्गावरील रस्ते दुपारी बारापासून आवश्यकतेनुसार बंद केले जाणार आहेत.

बंद रस्ते व त्याला पर्यायी रस्ते

  • गणेश खिंड रस्ता-रेंजहिल्स ते संचेती चौक बंद.
  • पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलिस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप
  • गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) – खंडुजी बाबा चौक ते वीर चाफेकर चौक दरम्यान बंद.
  • पर्यायी रस्ता- खंडुजी बाबा चौक, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स
  • शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक बंद.
  • पर्यायी मार्ग-गाडगीळ पुतळा, कुंभार वेस, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल
  • कुंभार वेस चौक, गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक रस्ता बंद
  • शनिवारवाडा ते स. गो. बर्वे चौक रस्ता बंद
  • लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक ते टिळक चौक बंद
  • टिळक रस्त्यावरील पूरम चौक ते टिळक चौक रस्ता बंद
  • शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी ते खंडुजी बाबा चौक रस्ता बंद

हेही वावा

पुणे : वाहतूक पोलिसांच्या मदतीला आणखी साडेसहाशे वॉर्डन

नगर : दोन एकरावरील ऊस जळून खाक

Back to top button