पुणे: जमीनीचे कंपाउंड तोडून मालकावर कोयत्याने वार | पुढारी

पुणे: जमीनीचे कंपाउंड तोडून मालकावर कोयत्याने वार

नारायणगाव (पुणे), पुढारी वृतसेवा: जबरदस्तीने जमिनीत घुसून तार कंपाउंड काढणाऱ्यांना विचारणा करून विरोध केला असता दोघांनी जमीन मालकाच्या डोक्यात कोयता घालून जखमी केले. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथे सोमवारी (दि. ५) सायंकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली.

परेश शांतीलाल गुंदेचा (वय ३३, रा. दरांदळे मळा, नारायणगाव, ता. जुन्नर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतमालकाचे नाव आहे. या प्रकरणी महेंद्र मच्छिन्द्र कोकाटे (रा. हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) व सचिन मढीकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी याबाबत माहिती दिली.

फिर्यादी परेश गुंदेचा हे त्यांनी खरेदी केलेली शेतजमीन पाहण्याकरिता गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या जमिनीला घातलेले तारेचे कंपाउंड महेंद्र कोकाटे व सचिन मढीकर हे दोघे काढत असताना दिसले. गुंदेचा यांनी ‘माझ्या जमिनीतील कंपाउंड का काढता,’ अशी विचारणा केली असता कोकाटेने ‘तू लोकांना पैसे देऊन आमची जमीन नावावर करून घेतलीस. तुझी कागदपत्रे खोटी आहेत. तू या ठिकाणी यायचे नाही,’ असे धमकावले. तेव्हा गुंदेचा यांनी ‘मी रीतसर जमीन खरेदी केली आहे व पैसे दिले आहेत. तू मला त्रास देऊ नको,’ असे म्हटले असता मढीकरने गुंदेचा यांना पकडले आणि महेंद्रने कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केला. गुंदेचा यांनी तो वार डाव्या हातावर घेतला असता ते गंभीर जखमी झाल्याचे ‌फिर्यादीत म्हटले आहे. नारायणगाव पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button