हिंजवडी : मुळा नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ | पुढारी

हिंजवडी : मुळा नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ

हिंजवडी (पुणे) : आयटी पार्क हिंजवडीतील उच्चभ्रू सोसायटी शेजारून वाहत असलेल्या मुळा नदीत दूषित पाणी वेळोवेळी सोडले जात असल्याने रहिवाशांना व स्थानिक नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे आसपासच्या बोअरवेलचेही पाणी दूषित येत आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना प्रक्रिया करून पाणी प्यावे लागत आहे.

मात्र, फिल्टर केलेले पाणीदेखील हिरव्या रंगाचे दिसत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. गावलागतच्या मुळा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह गेल्या काही महिन्यांपासून वाहते नसल्याने साठलेल्या पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आली आहे. तसेच, डासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

नदीचे पाणी वाहते करण्याची मागणी

नदी पात्रात एकाच ठिकाणी पाणी साठून राहत आहे. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला होता. पात्रातील पाणी गडद हिरवे झाले होते. ते पाणी पिऊन व रोगराईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील जलसृष्टीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नदीपात्रातील रोगराईला आमंत्रण देणारे व पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे दूषित पाणी जाण्यासाठी ते वाहते करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा आणि तालुक्यातील मुळा नदीलगतच्या गावांत पुरविल्या जाणार्या पाण्याचे ऑडिटदेखील करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतीचेही नुकसान

मुळशीतून वाहणार्‍या मुळा-मुठा नदीच्या पात्रात औद्योगिक कंपन्यांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याने विशेष म्हणजे ते शेतीलासुद्धा वापरता येत नसल्याने परिसरातील शेतकरीसुद्धा संताप व्यक्त करत आहे.

नदीच्या पाण्यावर शेवाळे

नदीचे पाणी वाहते राहिल्याने ते स्वच्छ राहील. मात्र, सध्या ते वापरण्या व पिण्यायोग्य राहिले नाही. पावसाळ्यापर्यंत अधून-मधून पाणी सोडल्यास नदी पात्रातील शेवाळे, राडारोडा, जलपर्णी निघून जाईल. तसेच, दुर्गंधीही येणार नाही. दरम्यान, याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने मार्ग काढत रविवारी रात्री काही प्रमाणात मुळशी धरणातून पाणी सोडले होते. त्यामुळे आता सोमवारी नदी पात्राचा परिसर काही प्रमाणात स्वच्छ दिसत होता. मात्र, अन्य दिवशी नदीच्या पाण्याचा घास वास येत असतो.

हेही वाचा

कर्नाटकात शाळेतील मुलींना स्कर्ट ऐवजी चुडीदार, पँट वापरण्याची शिफारस

‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपरी शहर राज्यात अव्वल

Back to top button