‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपरी शहर राज्यात अव्वल

‘माझी वसुंधरा’ अभियानात पिंपरी शहर राज्यात अव्वल
Published on
Updated on

पिंपरी (पुणे) : राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियानात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या अमृत शहराच्या गटात आणि हरित आच्छादन व जैवविविधता प्रकारात पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल ठरली आहे. अमृत गटात 8 कोटी रुपये व प्रमाणपत्र, जैवविविधता प्रकारात 2 कोटी रुपये व प्रमाणपत्र असा एकूण 10 कोटी रकमेचा पुरस्कार पालिकेस मिळाला आहे.

मुंबईत सोमवारी (दि. 5) झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुरस्कार स्वीकारले. या वेळी विविध खात्याचे मंत्री तसेच, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त रविकिरण घोडके, स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयक सोनम देशमुख, उपअभियंता हरविंदरसिंग बन्सल, सेवानिवृत्त उद्यान अधीक्षक गोरख गोसावी आदी उपस्थित होते.

राज्यामध्ये 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान 3.0 राबविण्यात आले. अभियानात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचे 43 अमृत शहरांचा गट तयार करण्यात आला होता. या गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने अव्वल क्रमांक प्राप्त केला.

महापालिकेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित

शहरातील हरित आच्छादित व जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन व पुनरुज्जीवन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रचार व प्रसार, शहरामध्ये एलईडी दिव्यांचा वापर, सौर ऊर्जेचा वापर, बायोगॅसचा वापर, अभियानाचा प्रचार व प्रसार, पर्यावरण दूतची नियुक्ती, अभियानामधील नागरिकांचा सहभाग, माझी वसुंधरा 1.0 व 2.0 अंतर्गत जगवलेल्या वृक्षांची संख्या तसेच, पूर्तता आदी बाबींसाठी गुण होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने या प्रकारात यशस्वी कामगिरी केली.

दरम्यान, सायकल चालविण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल पालिकेला ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर या आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी गतिमानता अभियानामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरीबद्दलचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पालिकेस मिळाला आहे

पुरस्काराने शहराच्या नावलौकिकात भर

शहराचा सर्वांगीण विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमीच विविध उपक्रम राबवित आहे. राज्याने पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. हा सन्मान खर्‍या अर्थाने शहरवासीयांचा सन्मान आहे, अशी भावना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news