बारामती : शेतकरी उत्पादन कंपनीला एक कोटीचे अनुदान | पुढारी

बारामती : शेतकरी उत्पादन कंपनीला एक कोटीचे अनुदान

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत बारामती तालुक्यातील मौजे सांगवी येथील नाथसन शेतकरी उत्पादन कंपनीला 1 कोटी 12 लाख 61 हजार रुपयांच्या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मंजूर करण्यात आला. बारामती तालुक्यातील कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या प्रयत्नातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत हे अनुदान मंजूर झाले आहे.

सांगवी गावात 15 युवा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन नाथसन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर औषध विक्री, बियाणे विक्री, खत विक्री असे नियोजन करून शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. शेतकर्‍यांना अधिक लाभ मिळावा म्हणून भाजीपाला आणि फळांवर प्रक्रिया करून तयार झालेली अन्न उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे दीड कोटी आहे. त्याचबरोबर कंपनीच्या मालकीचे कृषी सेवा केंद्र आहे.

नाथसन शेतकरी उत्पादन कंपनीने मुल्यसाखळी उपप्रकल्पासाठी प्रक्रिया कारखाना इमारतीस इतर यांत्रिक सुविधांसाठी एकूण 2 कोटी 53 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रकल्प अहवाल सादर केला होता. कृषी विभागाच्या समितीने शासकीय मापदंडानुसार 1 कोटी 87 लाख 68 हजार रुपये ग्राह्य धरून स्मार्ट प्रकल्पांतर्गत 1 कोटी 12 लाख 61 हजार रुपये अनुदान मंजूर केले. यामुळे प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

लहान शेतकरी आणि नवउद्योजकांना फायद्याचा प्रकल्प

जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीला उपप्रकल्पासाठी 1 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मंजूर झाला आहे. अनुदानामुळे सहा महिन्यांच्या काळात प्रोसेसिंग युनिटचे काम पूर्णत्वास नेण्यास मदत होईल. या माध्यमातून शेतकर्‍यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याचे कार्य करण्यात येईल.

– नितीन तावरे, अध्यक्ष, नाथसन शेतकरी उत्पादन कंपनी.

Back to top button