कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी गायब | पुढारी

कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी गायब

मिलिंद कांबळे
पिंपरी(पुणे) : कासारवाडी येथे असलेल्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय नागरिक विविध कामे घेऊन येतात. मात्र, संबंधित अधिकारीच जागेवर नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत होते. एकाच कामासाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, वल्लभनगर, सांगवी, नवी सांगवी या भागांचा समावेश ह क्षेत्रीय कार्यालयात आहे. तेथील असंख्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात. कार्यालयाचे कामकाज पालिकेच्या महिला आयटीआयच्या इमारतीमध्ये चालते.

जप्त केलेल्या फ्लेक्सचा खच

जिन्याच्या कोपर्‍यात असलेल्या जागेत आधारकार्ड नोंदणी होते. त्यासाठी नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत उभे असतात. ठराविक टोकण दिल्यानंतर उर्वरित नागरिकांना दुसर्‍या दिवशी या म्हणून सांगितले जाते. सध्या येथे नोंदणी बंद असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले. कार्यालय ये-जा करताना कोणाला हटकले जात नाही. चौकशी केल्यानंतर इमारतीमधील सुरक्षारक्षकांकडून हटकले जाते. कार्यालयाच्या आवारात नवीन हॅगींग लिटर बिन्स, कॅन्टीनही बंद नामफलक, हातगाड्या, बोर्ड व फ्लेक्सच्या लोखंडी चौकटी आदींचा खच पडला आहे.

धडक कारवाई पथकातील दोन पिंजरा वाहने तसेच, पथदिवे दुरूस्तीचे वाहन दिवसभर आवारातच थांबत असल्याने येणार्‍या नागरिकांना वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. नाईलाजास्तव रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. किऑक्स मशिनचा वापर होत नसल्याचे ते धूळखात पडले आहे. आवारातील उद्यानाची स्थिती सुमार आहे.

केबलच्या वायरी उघड्यावर

बसण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. अतिक्रमण कारवाईच्या बंदोबस्तासाठी असलेले महाराष्ट्र पोलिस दलाचे जवान सभागृहात बसतात. फायली व साहित्य असेच उघड्यावर पडलेल्या दिसल्या. आवारात लोखंडी कपाटे, वीजपुरवठा बॅकअपच्या बॅटर्‍या, केबलच्या वायरी उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ये-जा करताना अडथळा निर्माण होतो. तसेच, स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य या विभागाच्या अधिकार्‍यांकडे जाणार्‍या प्रवेशद्वाराभोवतीच कपाटे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांना तातडीने बाहेर पडताना अडथळे निर्माण होऊ शकतात.

अधिकार्‍यांशी फोनवर संपर्क करा

पाणीपुरवठा, ड्रेनेज, अतिक्रमण, स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे आदी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना संबंधित विभागाचे अधिकारी भेटत नाहीत. साईटवर गेले आहेत. त्यांना मोबाईलवर संपर्क साधा, असे उत्तरे उपस्थित कर्मचारी व शिपायांकडून दिले जाते. त्यामुळे एकाच कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागत असल्याचे नागरिकांनी रोष व्यक्त केला. रोख रक्कम नसल्यास पाणीपट्टीचे बिल स्वीकारले जात नाही. त्यांना एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम घेऊन यावे लागले. त्यावरून दिवसभरात अनेकदा वाद होतात. पाणीपुरवठा विभागाता नळजोडचा अर्ज संपल्याचे शिपायाने सांगितले. मात्र, 20 रूपयांची नोट दिल्यानंतर त्यांनी बाजूला घेऊन अर्ज दिला.

कॅन्टीनही बंद

कार्यालय परिसर स्वच्छ आहे. पिण्याचे फिल्टर केलेले पाणी उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांना बसण्यासाठी पुरेशा संख्येने बाके नाहीत. स्वच्छतागृहात साफसफाई होती. तसेच, तेथे पंखाही सुरू होता. पुरुषांच्या स्वच्छतागृहाबाहेर महिलांसाठी नॅपकीन खरेदीचा बॉक्स लावला आहे. मात्र, ते बंद स्थितीत होते. तेथेच बंद पडलेला पाण्याचा फिल्टर पडून आहे. येथील साई शारदा व्यायामशाळेस टाळे असल्याचे दिसले. कॅन्टीनही बंद आहे.

हेही वाचा

चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात सुविधांचा बोजवारा

पिंपरी- चिंचवड महापालिकेचे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय समस्यांचे आगार

Back to top button