पिंपरी- चिंचवड महापालिकेचे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय समस्यांचे आगार | पुढारी

पिंपरी- चिंचवड महापालिकेचे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय समस्यांचे आगार

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयातील खुर्च्या जेवणाची वेळ संपल्यानंतरही बराच वेळ रिकाम्याच असतात; तसेच कार्यालयाबाहेर ताटकळत बसलेल्या नागरिकांची कोणीही चौकशी अथवा विचारपूस करतानाही कोणी आढळत नाही. त्यामुळे येथील कर्मचारीवर्ग ‘लंच टाईम’च्या नावाखाली ‘टाईमपास’ करीत असल्याचे या ठिकाणी कामानिमित्त आलेले नागरिक सांगतात.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पाणीपट्टी, घरपट्टी, विद्युत पथदिवे, मलवाहिनी याबाबतची कामे या कार्यालयामार्फत मार्गी लावली जातात.

त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येत असतात. येथील कर्मचार्‍यांना दुपारी दोन ते अडीच अशी जेवणासाठी वेळ ठरवून देण्यात आली आहे; मात्र काही अपवाद वगळता कोणीच वेळेत आपल्या जागेवर येत नसल्याचे ‘पुढारी’ ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. तसेच, दरवाजाबाहेर ताटकळत बसलेल्या नागरिकांची कोणीही विचारपूस किंवा चौकशी करीत नसल्याचेही दिसून आले. या मनमानी कारभारामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच लक्ष घालून आपल्या कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे.

नागरिकांना नाही ‘आधार’

‘ड’ प्रभाग कार्यालयातील आवारात आधार केंद्र आहे; मात्र बहुतांश वेळा या सेंटरमध्ये कोणीच नसल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे नागरिक हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत. कार्यालयाबाहेर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता, पिंपरी- चिंचवड शहरातील सर्वच आधार केंद्र तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याचे समोरून सांगण्यात आले. तसेच, आणखी सात ते आठ दिवस आधार केंद्र बंदच राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली.

आधार कार्डवरील नावात बदल करण्यासाठी ‘ड’ प्रभाग कार्यालयात हेलपाटे मारत आहे. येथील आधार केंद्र नेहमी बंदच असते. तसेच, केंद्राच्या बाहेर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यास समोरून काहीही प्रतिसाद दिला जात नाही.

– राजेश विश्वकर्मा,
सामान्य नागरिक

हेही वाचा

Balasore Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

स्वराज्य यात्रेमुळे सर्वसामान्यांना मिळणार ताकद; ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांचे मत

 

Back to top button