चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात सुविधांचा बोजवारा | पुढारी

चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात सुविधांचा बोजवारा

वर्षा कांबळे

पिंपरी(पुणे) : चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात दररोज नागरिक पाणी बिल भरणे, बांधकाम, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत आदींच्या समस्या घेऊन येत असतात. मात्र, याठिकाणी अधिकारी वेळ पाळीत नाहीत. तसेच, नागरिकांना चांगली वागणूक देत नाहीत आणि समस्या वेळेत सोडविल्या जात नाही, असा नाराजीचा सूर नागरिकांमधून येत आहे. नागरिकांना नागरी सुविधा देणे व त्याबाबत समस्या सोडविण्यासाठी त्या भागात क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

याठिकाणी फक्त लाईट, पाणी व घंटागाडी याशिवाय कोणतीच कामे केली जात नाही. कार्यालयाच्या क्षेत्रात येणार्‍या भागातील रस्त्यावरील खड्डे, फुटपाथ दुरुस्ती केली जात नाही. रस्त्यांची स्वच्छता केली जात नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते. पण याचा काही उपयोग होत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. जनसंवादला नागरिक येत होते पण त्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी येणे कमी केले.

कार्यालयात बसायला जागा नाही

क्षेत्रीय कार्यालयात नागरिक कामानिमित्त गेले आणि अधिकारी नसले किंवा गर्दी असेल तर नागरिकांना बसायला पुरेशी जागा नाही. कार्यालयात एक लाकडी बाक आणि बाहेरच्या बाजूला एक लोखंडी बाक टाकण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्याजवळ अस्वच्छता

कर्मचारी आणि नागरिक यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या कुलरजवळ खाली अस्वच्छता आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त वेळ कार्यालयात लागला तर पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते.

अस्ताव्यस्त दस्तऐवज

कार्यालयात दस्तऐवज ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या कपाटांना लॉक नाही. त्यामुळे कपाटांची दारे उघडी राहतात. त्यामध्ये कागदपत्रे कशीही बेशिस्तपणे ठेवण्यात आली आहेत.

तुम्ही कितीही तक्रार करा त्याची दखल घेतली जात नाही. त्यानंतर सारथीवर तक्रार आणि 15 मार्च रोजी मी आयुक्तांना एक निवेदन दिले होते. मी त्यात सहा गोष्टी टाकल्या होत्या त्यांचे निरसन झालेच नाही. मोरया स्टेडियमचा धुळीचा त्रास नागरिकांना होत आहे. परिसरातील अनेक रस्ते विकसित झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडी होत आहे. तसेच, फुटपाथवर अतिक्रमण होत असल्यामुळे चालणेही अवघड झाले आहे.

– जितेंद्र निखळ, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी

क्षेत्रीय कार्यालयात कामासाठी गेल्यावर तेथील कर्मचार्‍यांची नागरिकांशी वागणूक व्यवस्थित नसते. कर्मचारी जागेवर नसतात. तसेच, अधिकारीही वेळेत भेट नाहीत. कार्यालयात गेलो की अधिकारी बाहेर गेले असल्याचे सांगतात. त्यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ ठरवावी. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

– मधुकर बच्चे, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button