ट्रॅव्हल्सचा रास्ता रोको; पिंपरीत वाहतूक कोंडी नित्याची | पुढारी

ट्रॅव्हल्सचा रास्ता रोको; पिंपरीत वाहतूक कोंडी नित्याची

राहुल हातोले

पिंपरी(पुणे) : शहरातील कासारवाडी, चिंचवड, निगडी, भोसरी, पिंपळे सौदागर आदी भागात खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेस सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत वर्दळीच्या रस्त्यांवरच आपले थांबे निर्माण केले आहेत. त्यामुळे या भागात दुपारपासूनच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.

ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुण्याच्या धर्तीवर शहरातही खासगी ट्रॅव्हल्ससाठी जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे; मात्र अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सत्तावीस लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोर्‍यातून तसेच देशाच्या इतर भागातून रोजी रोटीच्या शोधात येऊन स्थायिक झाला आहे. लग्न सराई, दिवाळी, दसरा आदी सण उत्सव काळात गावी जाणार्‍या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे रेल्वे आणि एसटीचे आरक्षण फुल्ल होऊन जाते. परिणामी प्रवासी खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्सची वाट धरतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरु आहे.

खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या शहरात येणार्‍या गाड्यांची संख्याही मोठी आहे. पहाटेपासून ते साधारण सकाळी नऊपर्यंत या गाड्या इतर ठिकाणाहून प्रवासी घेऊन शहरात दाखल होतात; तसेच सायंकाळी चारच्या दरम्यान या गाड्या परतीच्या मार्गाला लागतात; मात्र या गाड्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यातच उभ्या केलेल्या आढळून येतात; परिणामी शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर कोंडीची समस्या उद्भवते.

पुण्याच्या धर्तीवर शहरातही हवी वेगळी जागा

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतुक समस्या आ वासून उभी आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पुणे महापालिकेने खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या उभ्या करण्यासाठी वाकडेवाडी येथे शहराबाहेर स्वतंत्र जागा दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील खासगी ट्रॅव्हल्समुळे होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका याबाबत केव्हा धोरण राबविणार, असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिकांना पडला आहे.

वाहतूकीस अडथळा केल्यास कारवाई

खासगी ट्रॅव्हल्सच्या थांब्यामुळे शहरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. अशा वाहनांवर कलम 122 नुसार वाहतूकीस अडथळा निर्माण केला म्हणून कारवाई करण्यात येते. 500 रुपये दंड आकारला जातो. पुन्हा त्याच वाहनाने अडथळा निर्माण केला तर 1500 असा दरवेळी 1500 रुपयांच्या प्रमाणात दंड आकारण्यात येतो.

वाहतुक शाखेची रोजच परीक्षा

खासगी ट्रॅव्हल्सच्या थांब्यांमुळे रोज होणारी वाहतूक कोंडी सोडवता सोडवता वाहतूक शाखेच्या नाकी नऊ आले आहेत. रोजच सायंकाळच्या वेळी ही वाहतूककोंडी सोडवितांना कर्मचार्‍यांची जणू परीक्षाच असते.

मालवाहतूक करणारी वाहन उभी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतूक नगरीची सोय केली आहे. येत्या शहर सुधारणा आराखड्यामध्ये (डी.पी.) ट्रॅव्हल्सच्या पार्किंगसाठी आरक्षित जागेचा प्लान मंजूर केला आहे. भविष्यात हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूकीचा प्रश्न मिटू शकेल.

                               – रविकिरण घोडके, उपायुक्त, पिं. चिं. महापालिका

Back to top button