फास्टफूडमुळे वाढताहेत पचनाच्या समस्या | पुढारी

फास्टफूडमुळे वाढताहेत पचनाच्या समस्या

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे) : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचे आहारातील प्रमाण वाढले आहे. पर्यायाने, पचनाच्या समस्यांमध्ये देखील वाढ होत आहे. व्यक्तीची पचनक्रिया चांगली असेल तर आरोग्य देखील चांगले राहते. 90 टक्के आजाराचे मूळ कारण हे पचनक्रियांशी संलग्न असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विविध कारणांमुळे दररोज पचन विकारावर उपचार करण्यासाठी 150 ते 200 रुग्ण येत असतात. तर, खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण दिवसाला सरासरी 50 रुग्ण इतके आहे.

अपचनामुळे होणारे आजार

व्यक्तीची पचनक्रिया व्यवस्थित काम करत नसल्यास त्याला प्रामुख्याने आम्लपित्त, जुलाब, पोटदुखी, पचनसंस्थेचा कर्करोग, अ‍ॅसिडिटीमुळे होणारा अल्सर, पचनसंस्थेत आढळणारे संसर्गजन्य रोग आढळतात.

पौष्टिक आहार घ्यावा

निरोगी राहणे हे व्यक्तीच्या जीवनशैली आणि पौष्टिक आहारावर अवलंबून असते. पचनशक्ती चांगली राहण्यासाठी फळे, पालेभाज्या, फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. फास्टफूड टाळले पाहिजे. तळलेले, गोड आणि मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. रोजच्या जेवणात जास्त मेदयुक्त पदार्थ नसावेत. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. शरीरात दररोज किमान अडीच ते तीन लिटर जायला हवे. जर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल तर पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही. पर्यायाने पित्ताचा त्रास होतो.

मानसिक ताणतणाव हा देखील पचनसंस्थेच्या विकारांना कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे. ताणतणावामुळे जास्त खाण्याकडे कल वाढतो. त्याचप्रमाणे, बर्‍याचदा समतोल आहार न घेता फास्टफूडचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे कामातील ताणतणाव टाळावे. वेळेवर जेवण करावे.

आरोग्याची काळजी घ्या

रोजच्या जेवणात स्निग्ध पदार्थ, सकस, ताजा आणि संतुलित आहार असायला हवा. त्याचप्रमाणे, नियमित व्यायाम देखील गरजेचा आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थित राहते. व्यायामाबरोबरच शरीराला पुरेशी विश्रांती देखील गरजेची आहे.

शरीरामध्ये अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तरच आपले आरोग्य व्यवस्थित राहते. शुक्रवारी (दि. 29) जागतिक पचन स्वास्थ्य दिन आहे. जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात तेव्हाच आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो. व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीर निरोगी हवे. मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असायला हवी.

व्यक्तीची पाचनक्षमता चांगली असेल तर, त्याच्या हृदयाचे, फुफ्फुसाचे आणि मेंदूचे स्वास्थ्य चांगले राहते. त्यामुळे आपल्याला पचनाचे विकार जडू नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी फळे, पालेभाज्या, फायबरयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. पाणी दररोज अडीच ते तीन लिटर प्यायला हवे. नियमित व्यायाम करायला हवा.

                          – डॉ. प्रवीण साळुंके, पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत विविध कारणांमुळे पचनाच्या आजाराशी संबंधित दररोज सरासरी 150 ते 200 रुग्ण तपासणीसाठी येतात. पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असायला हवे. तुम्ही कशा प्रकारचा आहार सेवन करता, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. फास्टफुडमुळे पचनाचे विकार होतात. त्यामुळे फास्टफूड टाळायला हवे.

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता,
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय

Back to top button