बारामती : पालिका सर्वेक्षणामध्ये आढळली 107 अनधिकृत होर्डिंग | पुढारी

बारामती : पालिका सर्वेक्षणामध्ये आढळली 107 अनधिकृत होर्डिंग

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोरगाव रस्त्यावर एक होर्डिंग वार्‍याने कोसळल्यावर अखेर बारामती नगरपालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरुवात केली. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 107 होर्डिंग अनधिकृत असल्याचे दिसून आले. पालिकेने अशी होर्डिंग हटविण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

शहरात नगरपरिषदेची कोणती परवानगी न घेता होर्डिंग लावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भले मोठे होर्डिंग सोसाट्याचे वारे, वादळात धोकादायक ठरू शकतात. पावसाळा तोंडावर आला असून, सोसाट्याच्या वार्‍यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पालिकेकडून आतापासूनच काळजी घेतली जात आहे. शहरातील होर्डिंग हटविली जात आहेत. यासंबंधी पालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे.

यापूर्वीच ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. पालिकेच्या नोटिशीकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पालिकेने अशी होर्डिंग काढून टाकण्याचा निर्णय घेत कारवाई सुरू केली. मोरगाव रस्त्यावरील होर्डिंग कोसळल्यानंतर पालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे.

Back to top button