भोसरीत वाहनधारकांना शिस्त लावणार कोण ? | पुढारी

भोसरीत वाहनधारकांना शिस्त लावणार कोण ?

भोसरी(पुणे) : परिसरात दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पोलिसांनी रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेले फलक नावापुरतेच राहिले आहेत. बेशिस्त पार्किंगमुळे पादचार्‍यांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. वाहनधारकांना आवर घालणार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

परिसरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनधारकांना शिस्त लागावी हा त्यामागील हेतू आहे. परंतु, परिसरात चालक बेशिस्तपणे वाहने रस्त्याचाकडेला उभी करीत आहेत. परिणामी परिसरात वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे.

रस्त्याने चालणेही झाले अवघड

भोसरीतील बीआरटी बसस्थानकाजवळील रास्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. याठिकाणी मजूरअड्डा, बीआरटी व एसटी बस थांब्यामुळे सतत वाहने ये-जा करीत असतात. कामगारांची मोठी गर्दी असल्याने वाहने रस्त्यावरच ठाण मांडून असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा या मार्गावर वाहतूककोंडी सतत होत असते. बीआरटी व एसटी बसथांब्यामुळे बसेस उभ्या असतात. वाहतूक सुरळीत राहावी, याकरिता रस्त्याच्या डाव्या बाजूला बस उभ्या असतात. मात्र, या ठिकाणी रिक्षादेखील रस्त्यावर उभ्या करून प्रवासी भरण्यासाठी उभ्या असतात.

सकाळी चाकरमान्यांची कामावर असलेली लगबग असल्यामुळे परिसरात नागरिक व वाहनांची एकच गर्दी होते. रस्त्यावरील नागरिकांना गर्दीतून वाट काढणे जिकिरीचे ठरत आहे. अनेकदा या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करून बेजबादार वाहनधारकांना शिस्त लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सेवा रस्त्यावर वाहनांच्या रांगा

महापालिकेने पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चांदणी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौकापर्यंत अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. तरीदेखील बेशिस्तपणाने या ठिकाणी वाहने लावली जात आहेत. वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर नो पार्किंगची अंमलबजावणी कधी होईल ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यापूर्वी आळंदी रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सम-विषम पार्किंगचे केलेले नियोजन नावापुरते उरले असून, दुतर्फा पार्किंग केले जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.

Back to top button