सांगवीत रस्त्याच्याकडेला कचर्‍याचे ढीग; परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त | पुढारी

सांगवीत रस्त्याच्याकडेला कचर्‍याचे ढीग; परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्सेवा : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसर स्मार्ट होण्यासाठी महापालिका नवनवीन प्रयोग करत आहे. मात्र सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील कचरा समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येकाच्या सोसायटीच्या आवारात, अंतर्गत रस्त्यांवर कचर्‍याची घंटागाडी दररोज वेळेत येत असते. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत टाकणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. याबाबत महापालिका लाखो रुपये खर्च करून जनजागृती केली जात आहे. तरीही नागरिक रस्त्यावर कचरा टाकताना दिसत आहे.

कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

इंदौर शहराचा स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक आहे. तेथील नागरिक हे कचरा घराच्या अवतीभवती जिरवता किंवा घंटागाडीत टाकतात. बागेत, परिसरात, रस्त्याच्याकडेला पडलेल्या झाडांचा पालापाचोळा गोळा करून त्याचे खत तयार करून तेच झाडांना
घालतात. परंतु, परिसरातील नागरिक याची अंमलबजावणी न करता कचरा रस्त्याच्याकडेला टाकताना दिसत आहे. त्यामुळे कचरा टाकणार्‍या नागरिकांना कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपळे गुरव परिसरात महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक कामे केली आहेत. यामध्ये रस्ते, पदपथ, स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, चौक सुशोभीकरण, स्मार्ट उद्याने, स्मार्ट शौचालय आदी कामांना समावेश आहे. मात्र, कचरा समस्या सोडविताना प्रशासनाला यश आल्याचे दिसत नाही. अनेकदा खासगी मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, पदपथावर नागरिक सर्रास कचरा टाकताना दिसतात.

भगतसिंग चौक, कासारवाडी-पिंपळे गुरव पूल, राजीव गांधी वसाहत, मोरया पार्क, एच. पी. गॅस गोडाऊन, लक्ष्मीनगर, साठ फुटी रोड, शिवरामनगर, काटेपुरम बॅडमिंटन हॉल शेजारील मोकळे मैदान, मयूरनगरी, पीडब्ल्यूडी मैदान आदी ठिकाणी कचर्‍याचे ढिगारे दिसत येत आहेत. परिसरात कचरा पडल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

Back to top button