येरवडा कारागृहातील कैद्यांना हास्यविनोदातून ताणतणाव मुक्तीचे धडे | पुढारी

येरवडा कारागृहातील कैद्यांना हास्यविनोदातून ताणतणाव मुक्तीचे धडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी स्ट्रेस रिलीज फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख यांनी बंद्यांना हास्यविनोदातून ताणतणामुक्तीचे धडे दिले. या कार्यशाळेच्या दोन सत्रांत 300 बंद्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक शिवशंकर पाटील आदी उपस्थित होते.

वर्षानुवर्षे भिंतीआड असलेल्या बंद्यांनी स्वच्छंदीपणे सहभागी होऊन या कार्यशाळेत हास्याचे क्षण अनुभवले. कारागृहातील बंद्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलावे, त्यांची ताण-तणावातून मुक्तता व्हावी, या हेतूने गुप्ता यांच्या संकल्पनेतून बंद्यांच्या आरोग्याकरिता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख यांनी विविध प्रकारची सकारात्मक उदाहरणे देऊन तसेच हास्यविनोदातून तणाव मुक्त जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले.

कारागृहातील बंद्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत यासाठी ताणतणावमुक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुन्हा केल्यामुळे होणारा पश्चाताप, शारीरिक व्याधी, जीवनाचे महत्त्व याबद्दलचे मार्गदर्शन त्यांना करण्यात आले. या वेळी उपस्थितांपैकी काही बंदीवानांनी व्याख्यानामुळे तणाव कमी झाल्याचे सांगितले.

                                   – अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक
                                        व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा

Back to top button