जगभरात होत नाही ते पुण्यात मात्र होतंय | पुढारी

जगभरात होत नाही ते पुण्यात मात्र होतंय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘जगभरात कुठेही नदीचे पात्र कमी केले जात नाही, पुण्यात मात्र महापालिका ठेकेदारांना काम देऊन हे काम करीत आहे,’ या शब्दात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्पाच्या कामांवर टीका केली आहे.
पुणे महापालिकेकडून साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे.

या कामाच्या पहिल्या तीन टप्प्यांतच तब्बल सहा हजार झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे पर्यावरणवाद्यांसह अनेकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात त्यावर आक्षेप घेतला होता. आता त्यांनी पुन्हा डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याच्या हँडलला टॅग करीत टि्वटच्या माध्यमातून या प्रकल्पावर टीका केली आहे. त्यात प्रामुख्याने बंडगार्डन येथील नदीकाठी पक्ष्यांची घरटी असलेली झाडे आहेत. म्हणूनच येथे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे.

आता नदीचे पात्र 75 मीटर अरुंद होत आहे. ठेकेदारांकडून नदीपात्रात भराव टाकून वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे त्याचा फटका पुणेकरांना बसणार असल्याचे अभयारण्याच्या हँडलवरील टि्वटवर म्हटले आहे. त्यावर ठाकरे यांनी नदीकाठी असलेली पक्ष्यांची घरे असलेली झाडे काढली जात आहेत. नदी अरुंद होत आहे, अशी खंतही व्यक्त केली जात आहे.

Back to top button