बालभारतीचे पुस्तक आता चार भागांमध्ये | पुढारी

बालभारतीचे पुस्तक आता चार भागांमध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पहिली ते आठवीच्या पुस्तकांचे यंदा स्वरूप बदलणार असून, चार सत्रांमध्ये चार पुस्तके एका इयत्तेसाठी विद्यार्थ्यांना वापरता येतील. त्यामध्ये विविध विषयांचे एकच पुस्तक राहणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार असून, नवीन एकात्मिक पुस्तकांबरोबर जुनी पुस्तके बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. पहिली ते आठवी या इयत्तानिहाय सर्व विषयांच्या आशयाचे एकत्रीकरण करून पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आले असून, हे भाग स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना वार्षिक वेळापत्रकानुसार एक-एक करून स्वतंत्रपणे शाळेत सोबत घेऊन जाता येणार आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना बालभारती (मराठी), सुलभभारती (हिंदी), इंग्रजी, गणित आणि विज्ञान, इतिहास व नागरिकशास्त्र आणि भूगोल, अशा विषयांची पुस्तके शाळेत नेण्याऐवजी एकच पुस्तक नेता येणार आहे. एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्व विषयांचा साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत वर्गात होणार्‍या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी आवश्यक असा आशय समाविष्ट केलेला आहे. यंंदा या माध्यमातून नेमके काय साध्य होते, हे पाहूनच पुढील वर्षीच्या पुस्तकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

यंदा काय होणार?
पहिली ते आठवीच्या प्रत्येक इयत्तेसाठी तीन ते चार विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारे तीन महिन्यांसाठी एक असे चार भाग तयार करण्यात येतील. यामध्ये प्रत्येक धडा संपल्यानंतर नोट्स घेण्यासाठी वहीचे एकच पान जोडण्यात येणार आहे. या पानावर अवघड शब्द किंवा अन्य गोष्टींची नोंद करता येणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांबरोबर वह्यादेखील गरजेच्या राहणार आहेत.

यंदा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय चार भागांत पुस्तके उपलब्ध केली जातील. यामध्ये तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी वेगळे असलेले जुने पुस्तकदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक घेण्यात कोणतीही अडचण राहणार नाही.
                                 – कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

Back to top button