अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी सुरू

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील ५० आणि सिक्कीममधील ३२ विधानसभा जागांसाठी सकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू झाली. अरुणाचलमधील सत्ताधारी भाजपने आधीच ६० सदस्यांच्या विधानसभेत १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. त्याचवेळी सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला (SKM) सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून विरोधी SDF ला सत्तेतून बाहेर काढायचे आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या १० जागा बिनविरोध

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी ६ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान झाले होते. ८२.९५ टक्के मतदान झाले होते. अरुणाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ २ जून रोजी संपणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या याआधीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ६० जागांपैकी ४१ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवत पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत भाजपने १० जागांवर आधीच विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत १३३ उमेदवार रिंगणात होते. मुख्यमंत्री पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

अरुणाचल भाजपचे प्रमुख बियुराम वाहगे हे पक्के-केसांग मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री चौना में हे चौखान विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाने माजी मंत्री कुमार वाई, तकम यासारख्या अनेक प्रमुख व्यक्तींना रिंगणात उतरवले आहे.

सिक्कीममध्ये सरकार स्थापनेसाठी १७ जागा आवश्यक

सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. ३२ विधानसभा मतदारसंघांसाठी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, भारताचे माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया आणि तमांग यांची पत्नी कृष्णा कुमारी राय यांच्यासह १४६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १७ जागा मिळणे आवश्यक आहे. २०१९ च्या निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (SKM) १७ जागांवर विजय मिळवून सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news