रेल्वे मेगा ब्लॉक | एसटी स्थानकांवर गर्दी; प्रवाशांची कसरत

रेल्वे मेगा ब्लॉक | एसटी स्थानकांवर गर्दी; प्रवाशांची कसरत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी घेतलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमुळे शनिवारी (दि. 1 जून) प्रवाशांना पुणे-मुंबई प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागली. मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांवर गर्दी पाहायला मिळाली, तर तिकिटासाठी आरक्षण खिडक्यांवर लांबच लांब प्रवाशांच्या रांगा लागल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.

प्रवाशांचे हाल बेहाल

रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे अशी स्थिती पुण्यातील सर्वच एसटी स्थानकावर होती. गर्दीच्या नियोजनासाठी एसटी प्रशासनाने अतिरिक्त 30 गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, तिकिटासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले, अशी स्थिती स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांवर दिसली. पुणे-मुंबई प्रवास करणारे चाकरमानी, उन्हाळ्याच्या सुट्यांवरून पुन्हा घरी परतणारे प्रवासी आणि विकेंड सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पर्यटक प्रवासी, असे तीनही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाशांची शनिवारी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे कुठे कोंडी, तर एसटी स्थानकांवर गर्दी, तिकिटासाठी रांगा असे चित्र शनिवारी दिसले.

पुण्यातून मुंबईला जाणार्‍या आणि येणार्‍या डेक्कन क्वीन, डेक्कन, सिंहगड, प्रगती, वंदेभारतसह अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या रेल्वे प्रशासनाने ब्लॉकमुळे रद्द केल्या आहेत.

पुणे-मुंबई महामार्ग जाम

रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे पुणे-मुंबई नव्या आणि जुन्या मार्गावरील वाहतूक शनिवारी विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, या मार्गांवर अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

रेल्वे प्रशासनाने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अर्धा दिवस म्हणजेच 36 तासांचा ब्लॉक घेतला आहे. यामुळे नियमित पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांसह उन्हाळी सुट्यांवरून परतणारे आणि विकेंडला फिरण्यासाठी घराबाहेर पडणारे प्रवासी महामार्गांवर एकत्र आले. त्यामुळे शनिवारी वाहतुकीवर मोठा ताण पडला होता. मात्र, प्रशासनाला याबाबत माहिती असल्यामुळे सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. वाहतुकीत बदल करण्यात आले होते. महामार्ग पोलिसदेखील शनिवारी महामार्गावर तैनात असल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहरातील नवले पूल परिसरासह चांदणी चौक, बालेवाडी, वाकड फाटा, पुनवळेपासून पुढे बोरघाट, लोणावळा, पनवेल या मुंबईकडे जाणार्‍या आणि येणार्‍या मार्गावर काही ठिकाणी वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वाहतुकीवर प्रचंड ताण आल्याचे चित्र पाहायला मिळाले, दुपारी काही प्रमाणात वाहतूक कमी झाली होती. महामार्गावरील कोंडीमुळे शहरालगत महामार्गाला जोडणार्‍या छोट्या रस्त्यांवरही कोंडी झाल्याचे शनिवारी पाहायला मिळाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news