पुण्यात अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला | पुढारी

पुण्यात अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईसाठी गेलेल्या पथकावर मंगळवारी कैलास स्मशानभूमी परिसरातील रस्त्यावर अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी हल्ला केला. याप्रकरणी महापालिकेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ पालिका कर्मचार्‍यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता महापालिकेत ’काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. दरम्यान बंडगार्डन पोलिसांनी दोन महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
जून महिन्यात पुणे शहरात पुन्हा जी-20 परिषद होणार आहे.

या परिषदेसाठी जगभरातील 20 हून अधिक देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून विविध पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील रस्त्यांच्या सुशोभीकरणाबरोबरच रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात येत आहेत. त्यानुसार मंगळवारी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे एक पथक दुपारी दीडच्या सुमारास आरटीओ रस्ता ते रुबी हॉलपर्यंत कारवाईसाठी गेले होते. या वेळी कारवाईदरम्यान झालेल्या वादातून येथील काही व्यावसायिकांनी थेट काही कर्मचार्‍यांवर हल्ला करून त्यांना मारहाण केली. त्यात कर्मचार्‍यांना दुखापत झाली. या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

उपायुक्तांची दबंगगिरी

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी थेट लाथ मारून एका अनधिकृत स्टॉलवर कारवाई केल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. हा प्रकार महिनाभरापूर्वीचा असून, अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांवर संबंधित विक्रेते दमबाजी करीत असल्याने आपण त्याठिकाणी गेलो असताना हा प्रकार घडला, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने अशा पद्धतीची कारवाई अतिक्रमण उपायुक्तांनीच केल्याने त्यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी जगताप यांच्यावर कारवाईची मागणी केली.

याठिकाणी सातत्याने अतिक्रमणे होतात. ते रोखण्यासाठी एक कर्मचार्‍यांचे पथक नेमले होते. या कर्मचार्‍यांना दमबाजी करून कारवाईत अडथळा आणल्याचा प्रकार समजल्यानंतर मी त्याठिकाणी गेलो असता, अतिक्रमणधारकने मलाच दमबाजी केली. त्या वेळेस हा प्रकार घडला असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले.

Back to top button