पुणे: आळेफाटा चौकात आ. निलेश लंके यांनी केले भर उन्हात वाहतूक नियंत्रण | पुढारी

पुणे: आळेफाटा चौकात आ. निलेश लंके यांनी केले भर उन्हात वाहतूक नियंत्रण

आळेफाटा: पुढारी वृत्तसेवा: रविवारचा सुट्टीचा दिवस आणि लग्नाचा मुहूर्त असल्याने पुणे- नाशिक महामार्गावरील आळेफाटा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी, त्यातच पाऱ्याने चाळीशी ओळांडल्याने सहन न होणारे ऊन. अशात कित्येक वाहने अडकून पडलेली, हे दृश्य पाहून तेथून निघालेले पारनेरचे आमदार निलेश लंके गाडीतून उतरले. सोबतच्या कार्यकर्त्यांसह चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागेल. त्यांना पाहून प्रथम आसपाचे दुकानदार मदतीला आले. काही वेळात भर उन्हात अडकून पडलेल्या वाहनचालकांची सुटका झाली.

पारनेरचे आमदार निलेश लंके आज (दि.१४) दुपारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देहणे येथे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. सोबत बापू शिर्के, चंद्रकांत मोढवे, संदीप शिंदे, भाऊ साठे, ओंकार गारूडकर आदी कार्यकर्ते होते. आळेफाटा येथून जात असताना चौकात नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बराच काळ वाहतूक सुरू होती नव्हती. त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता आमदार लंके उघड्या डोक्याने गाडीतून खाली उतरले. चालतच चौकात आले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही आले.
त्यांनी तेथे वाहतूक पोलिसाला मदत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केला.

चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. प्रत्येकाला पुढे जायची घाई. डोक्यावर आग ओकणारा सूर्य. अशा परिस्थितीत आमदार लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हे प्रयत्न पाहून आसपासचे दुकानदार त्यांच्या मदतीला धावून आले. पोलिसांसोबत काही काळ वाहतूक सुरळीत करत आमदार लंके आणि त्यांचे कार्यकर्ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

दरम्यान, एस.टी. बस आणि इतर वाहनांत तासनतास अडकून पडलेल्या प्रवाशांची सुटका झाली. चौकातून जाताना खुद्द आमदार वाहतूक नियंत्रण करीत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशी त्यांना धन्यवाद देत होते.

हेही वाचा 

Back to top button