पारगाव : लग्नसराईमुळे वाघे-गोंधळी मंडळींना ’अच्छे दिन’ | पुढारी

पारगाव : लग्नसराईमुळे वाघे-गोंधळी मंडळींना ’अच्छे दिन’

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या लग्नसराईमुळे नव वधू-वर आपल्या कुलदैवताचा कुलाचार पूर्ण करण्यासाठी जागरण, गोंधळ-भराड आदी धार्मिक कार्यक्रम पूर्ण करीत आहेत. कार्यक्रमांमुळे वाघे मंडळी, गोंधळी, भराडी मंडळींना ’अच्छे दिन’ आले आहेत.
सर्वत्र सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागात लग्न विधीपूर्वी आपल्या कुलदैवताचा कुलाचार पूर्ण करण्याची परंपरा आजही कायम टिकून आहे. लग्न समारंभाच्या अगोदरच्या दिवशी नव वधू-वरांचा गोंधळ-भराड घातला जातो.

यामुळे सध्या हे धार्मिक कार्यक्रम करणारे वाघे मंडळी, गोंधळी, भराडी या मंडळींना चांगले दिवस आले आहेत. त्यांना दररोजच कार्यक्रमासाठी बोलावले जात आहे. दिवस-रात्र सध्या हे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. कोरोना काळात या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु, कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झाल्याने कलाकारांच्या हातांना कामे मिळू लागली आहे. जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी पाच ते सहा जणांचा संच असतो. पाच हजारांपासून ते पंधरा हजारांपर्यंत या कार्यक्रमाची बिदागी असते, असे गोंधळी भराडी जालिंदरनाथ हाटकर यांनी सांगितले.

लग्नसराईचा हा हंगाम आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. दोन महिन्यांतील झालेल्या कमाईवर आमचे वर्षभराचे कुटुंबाचे आर्थिक गणित अवलंबून असते. ग्रामीण भागात कुलदैवतांचा कुलाचार पूर्ण केला जातो. त्यातून आम्हालाही चांगले पैसे मिळतात.

                                बाळू हाटकर, गोंधळी भराडी, वळती.

Back to top button