पुणे बाजार समितीच्या सभापती पदी दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद बिनविरोध | पुढारी

पुणे बाजार समितीच्या सभापती पदी दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद बिनविरोध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिलीप काळभोर तर उपसभापती पदी रवींद्र कंद यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलमधील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे सभापती पद आणि भाजपला उपसभापती पद देण्यात आले आहे. पदाधिकारी निवड झाल्यानंतर बाजार समितीच्या मुख्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

मार्केट यार्डातील मुख्यालयात मंगळवारी (दि.9) सकाळी अकरा वाजता अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी पदाधिकारी निवडीसाठी सभेचे कामकाज सुरू केले. त्यामध्ये दिलीप काळभोर यांच्या सभापती पदासाठी संचालक प्रकाश जगताप सूचक असून रोहिदास उंद्रे अनुमोदक आहेत, तर कंद यांच्या उपसभापती पदासाठी प्रशांत काळभोर सूचक असून सुदर्शन चौधरी हे अनुमोदक आहेत.

दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने पदाधिकारी निवड बिनविरोध झाल्याची माहिती अध्यासी अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. बाजार समितीवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या भाजपसह सर्वपक्षीय पॅनेलचे 18 पैकी 13 संचालक निवडून आलेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 2 संचालक आहेत.

Back to top button