पुणे : आल्याची अवाक निम्म्यावर; काढणीअभावी 700 गोण्यांची घट; भाव स्थिर | पुढारी

पुणे : आल्याची अवाक निम्म्यावर; काढणीअभावी 700 गोण्यांची घट; भाव स्थिर

पुणे : पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काढणी न झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी आल्याची आवक 700 गोण्यांनी घटली. बाजारातील आवकेसह मागणीही घटल्याने आल्याचे गत आठवड्यातील भाव टिकून राहिले. घाऊक बाजारात आल्याच्या दहा किलोला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात त्याची 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसाचा परिणाम अन्य फळभाज्यांच्या आवकेवरही झाला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने श्रावणी घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची व शेवग्याच्या भावात घसरण झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव टिकून होते. रविवारी (दि. 7) बाजारात अवघी 90 ट्रकमधून शेतमालाची आवक झाल्याचे सांगण्यात आले.

परराज्यातील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग, हिमाचल प्रदेश येथून 5 ते 6 ट्रक मटार, कर्नाटकातून 4 ते 5 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 8 ते 10 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 800 ते 900 गोणी, टोमॅटो 11 ते 12 हजार क्रेटस, कोबी 4 ते 5 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, भुईमूग 2 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो इतकी आवक झाली होती.

चुका, चवळई, पुदीना, अंबाडी वगळता पालेभाज्यांचे दर टिकून अवकाळी पावसामुळे पुणे विभागातून पालेभाज्यांची आवक घटली आहे. मात्र, स्थानिक भागातून आवक चांगल्या प्रमाणात होत असून पालेभाज्यांचा दर्जाही चांगला आहे. बाजारात पालेभाज्यांना मागणी चांगली असल्याने चुका, चवळई, पुदीना व अंबाडी वगळता सर्व पालेभाज्यांचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

घाऊक बाजारात चुका जुडीमागे एक रुपया तर चवळईच्या जुडीमागे दोन रुपयांनी घसरली. तर पुदीना, अंबाडीच्या जुडीमागे प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बाजारात रविवारी कोथिंबिरीची सव्वा लाख जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोंथिबीरीची आवक 25 हजार जुडींनी वाढली.

Back to top button