भीमाशंकर अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणती | पुढारी

भीमाशंकर अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणती

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा : भीमाशंकर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलातील नऊ पाणवठ्यांच्या जागी वन्यप्राण्यांची पाहणी व निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांबरोबर हौशी निसर्गप्रेमीही सहभागी झाले होते. भीमाशंकर वन्यजीव विभागाने शुक्रवारी (दि. 5) व शनिवारी (दि. 6)हा कार्यक्रम राबविला. मे महिन्यात जंगलात मोजक्याच ठिकाणी पाणी शिल्लक असते. अशा ठिकाणी हमखास प्राणी पाण्यासाठी येतात, म्हणून या ठिकाणी मचाण बनवून प्राण्यांचे निरीक्षण करण्याचा अनुभव हौशी निसर्गप्रेमींना घेता येतो.

भीमाशंकर वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहायक वनसंरक्षक अमोल थोरात , वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. मागील आठ दिवसांत पाऊस झाल्याने जंगलात पाणी आहे. तरीही ज्या ठिकणी प्राणी हमखास येतात, अशा ठिकाणी मचाण बनवली होती.

या कार्यक्रमासाठी 20 कर्मचा-यांनी व इतर 20 लोकांनी सहभाग नोंदवला. निसर्गानुभवामध्ये सांबर, रानडुक्कर, ससा, भेकर, मोर, उदमांजर, घुबड आदी प्राणी-पक्षी प्रत्यक्षात पाहता आले. भीमाशंकर अभयारण्य हे घाटमाथ्यावर असल्याने येथे पाऊस व धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राणीनिरीक्षण करताना अडथळा आला.

तसेच पाऊस झाल्याने जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणी असल्यामुळे पाणवठ्यांवर प्राणी-पक्ष्यांची संख्या कमी दिसून आली. प्राणी निरीक्षणासाठभ मचाणावर बसल्यावर गोंगाट करू नका, मोबाइल वापरू नका, माहिती व्यवस्थित जमा करा व प्रत्येकाने काळजी घ्या, अशा सूचना भीमाशंकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिल्या होत्या.

Back to top button