अतिरेकी डाएट कराल तर आरोग्य बिघडेल ! | पुढारी

अतिरेकी डाएट कराल तर आरोग्य बिघडेल !

दीपेश सुराणा :

पिंपरी : तुमचे वजन वाढले आहे, आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतो, अशा एखाद्या जाहिरातीला भुलून जर तुम्ही डाएट करीत असाल तर क्षणभर थांबा. तुम्ही करत असलेले डाएट तुमच्या शरीराला, प्रकृतीला मानवते का, याचा विचार प्रथम करायला हवा. अतिरेकी डाएटमुळे तुमच्या शरीराला पोषक द्रव्यांची कमतरता जाणवू शकते. पोटाचे विकार होऊ शकतात. अशक्तपणा जाणवू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येक जण आपल्या डाएटकडे विशेष लक्ष देताना पाहायला मिळत आहे.

काही जण वजन कमी करण्यासाठी तर, काही जण वजन वाढवण्यासाठी डाएट करताना दिसतात. काही जण वजन नियंत्रणात आणण्यासाठी अतिरेकी डाएटिंग करतात. मात्र, डाएटचा अतिरेक देखील उपयोगाचा नसून त्यामुळे आरोग्यावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. शनिवारी (दि. 6) ’नो डाएट डे’ आहे. त्यानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांचे मत जाणुन घेतले.

’नो डाएट डे’ साजरा करण्याचे कारण
डाएट करणारी व्यक्ती ही आठवडाभर खाण्यावर नियंत्रण ठेवून डाएट पाळत असते. अशा व्यक्तींना एक दिवस दिलासा मिळण्यासाठी आणि स्वत:वर प्रेम करण्यासाठी नो-डाएट डे साजरा केला जातो. ब्रिटिश महिला मेरी इव्हान्स यांनी 6 मे 1992 रोजी ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे साजरा केला. ज्या दिवशी त्यांना आवडीचे पदार्थ खाता येतात. असाच ’नो डाएट डे’ शनिवारी (दि. 6) आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो.

मूळ उद्देश काय ?
आजकाल लोक स्वत:ची इतरांसोबत तुलना करतात. काहींना इतरांप्रमाणे बारीक होण्याची तर काहींना जाड होण्याची इच्छा असते. मात्र आपण इतरांसोबत स्वत:ची तुलना करण्याऐवजी स्वत:ला जसे आहे तसे स्विकारायला हवे. स्वत:वर प्रेम करायला हवे. हा आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे साजरा करण्यामागचा मूळ उद्देश आहे.

ऑनलाइन मार्केटिंगमुळे भलावण
तुमचे वजन वाढले आहे, आम्ही कमी करून देऊ.. आमचे डाएट प्लॅन घेतल्यास तुमचे वजन कमी होईल, अशा विविध ऑनलाइन मार्केटिंग तंत्राद्वारे भलावण करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्याला बर्‍याचदा भुलून बरेच जण त्यानुसार डाएटिंग करू लागतात. मात्र, त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्याऐवजी दुष्परिणामच जाणवू लागतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डाएटिंग करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

 

डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डाएटिंग करायला हवे. शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे, जीवनसत्व, कार्बोदके, प्रथिने तसेच, स्निग्ध पदार्थ यांची गरज असते. महिन्यातून एक दिवस पूर्ण उपवास केल्यास शरीराला उपयुक्त ठरु शकतो. मात्र, काही ठराविक दिवसांसाठी डाएट करताना त्याचे शरीरावर दुष्परिणाम तर होणार नाही ना, याचीही काळजी घ्यायला हवी. अतिरेकी डाएट केल्यास स्नायूंची ताकद कमी होऊ शकते.
                                     – डॉ. नंदकुमार माळशिरसकर, फॅमिली फिजिशियन

 

प्रत्येकाने आपली प्रकृती पाहूनच डाएट करायला हवे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगवेगळी असते. समतोल आहार आणि त्याला पूरक व्यायाम गरजेचा आहे. मधुमेह असल्यास साखर न खाणे, पिष्टमय पदार्थ, बेकरी पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे. तर, उच्च रक्तदाब असल्यास आहारात मिठाचे प्रमाण कमी असायला हवे. स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पनीर तसेच, कडधान्यांचा आहारात समावेश असायला हवा.
                                                         – डॉ. संजीव दात्ये, जनरल सर्जन

Back to top button