जेजुरीगड संवर्धनाची कामे लवकरच सुरू; आराखड्यातील विकासकामांना मंजुरी | पुढारी

जेजुरीगड संवर्धनाची कामे लवकरच सुरू; आराखड्यातील विकासकामांना मंजुरी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कुलदैवत असणार्‍या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकास आराखड्याची शासकीय पातळीवरून मंजुरी मिळालेली आहे. यातील पहिल्या टप्प्यात जेजुरीगड संवर्धनांतर्गत कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे. जेजुरीचा खंडेराया तसेच या ऐतिहासिक, सांस्कृतिक शहराची ओळख म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला होळकर तलाव, मल्हार गौतमेश्वर मंदिर, जननी तीर्थकुंड, ऐतिहासिक पेशवे तलाव, बल्लाळेश्वर मंदिर, दक्षिणेला असलेले लवथळेश्वर मंदिर व तीर्थकुंड यांची पाहणी केली. या वेळी पुरातत्व अभियंता रामेश्वर निपाणे, वास्तुसंवर्धन विशारद तेजस्विनी आफळे आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचा प्रारंभ जेजुरीतील मल्हारगडकोट मुख्य मंदिरापासून होणार असून, तीन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. यापैकी टप्पा क्र. 1 साठी 17 कोटी 22 लाख रुपयांपैकी 13 कोटी 73 लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामांची वर्क ऑर्डर लवकरच देण्यात येत आहे. यामध्ये गडकोट, मुख्य मंदिर, तटबंदी, सज्जा, गडकोट आवारातील उपमंदिरे (देवकुळे) यांचे वॉटरप्रुफिंग, ग्राऊंटिंग, डागडुजी, दुरुस्ती, जतन आणि संवर्धन होणार आहे. यामध्ये रासायनिक प्रक्रियेची कामे जास्त असून, झीज झालेले दगड बदलण्यात येणार आहेत.

भेसळयुक्त भंडारा

सध्या भेसळयुक्त व केमिकलचा वापर केलेल्या भंडारा उधळणीमुळे गडकोटाच्या दगडांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, तसेच रंगही बदलतो. ही समस्यादेखील मोठी असून, भेसळयुक्त किंवा केमिकलचा वापर असलेला भंडारा उधळण्यात येऊ नये किंवा त्याचा वापर होऊ नये यासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली.

Back to top button