पुणे : पालिकेने ’जलसंपदा’च्या रस्ता भाड्याचे थकविले 60 लाख | पुढारी

पुणे : पालिकेने ’जलसंपदा’च्या रस्ता भाड्याचे थकविले 60 लाख

पुणे : खडकवासला साखळी प्रकल्पातून निघणार्‍या मुठा डावा कालव्यातून शहरीकरणामुळे पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. परिणामी, या कालव्यावरील सुमारे 20 किलोमीटरचा रस्ता महापालिकेस भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. त्यास बारा वर्षांचा कालावधी उलटला आहे. भाड्यापोटीची रक्कम आतापर्यंत सुमारे 60 लाख रुपये झाली आहे. मात्र, अजूनही थकीत रक्कम पालिका प्रशासनाने ‘जलसंपदा’कडे अदा केली नाही. याबाबत ‘जलसंपदा’ने अनेकवेळा स्मरणपत्रे पाठविली आहेत. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद महापालिकेकडून मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पातून निघणारा जुना मुठा कालवा हा न्यू कोपरे, कोंढवे-धावडे, शिवणे, वारजे, हिंगणे, कोथरूड, एरंडवणे, शिवाजीनगर, बोपोडी, औंध या भागांतून जात आहे. हा कालवा 28 किलोमीटर लांबीचा आहे, तर सुमारे 6 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. मात्र, या कालव्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले. त्यामुळे या कालव्यातून पाणी सोडणे बंद करण्यात आले, तर कालव्यातील नऊ किलोमीटरपर्यंत पुणेकरांना पिण्यासाठी पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

कालव्यातून पाणी सोडणे अनेक वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘जलसंपदा’ने या कालव्यावरील सुमारे 20 किलोमीटरचा रस्ता महापालिकेस 2012 मध्ये भाडेतत्त्वावर वापरण्यास दिला आहे. रस्ता भाडेतत्त्वावर देताना एका किलोमीटरला वर्षाकाठी 9 हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. तसा भाडेकरारनामा दोन्ही प्रशासनांनी केला होता. या करारास बारा वर्षे उलटली असून, भाड्यापोटी 60 लाख रुपये पालिका प्रशासनाकडे थकीत आहेत. याबाबत जलसंपदा प्रशासनाने अनेकदा थकीत भाडे देण्यासाठी पालिका प्रशासनाला स्मरणपत्रे पाठविली. मात्र, त्यास कोणतेही उत्तर आलेले नाही.

मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पात आता नव्याने सहा ठिकाणी घाट विकसित करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने संगमवाडीत संगमावर तसेच सीओईपी महाविद्यालयाच्या ‘रिगाटा’ महोत्सवासाठीही वेगवेगळ्या सुविधा असलेला नवीन घाट विकसित केला जाणार आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या खर्चात वीस कोटींनी वाढ होणार आहे. साबरमतीच्या धर्तीवर महापालिकेने मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात संगमवाडी ते मुंढवा ब्रिज या दरम्यान तीन टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

त्यात जवळपास सहा किमी काठाचे काम झाले आहे. दरम्यान, या कामांमध्ये आता नव्याने तीन ठिकाणी घाट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. त्यात प्रामुख्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या अस्तित्वातील घाटाचा विस्तार तसेच सुधारणा केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल 13 कोटींचा खर्च येणार आहे. याठिकाणी दरवर्षी रिगाटा हा महोत्सव होतो.

तर संगमवाडीत ज्याठिकाणी मुळा-मुठा नद्या एकत्र येतात त्याठिकाणीही आणखी एक घाट विकसित करण्यात येणार आहे. येरवडा येथील गणेश घाटाचा विस्तार तसेच सुधारणाही केली जाणार आहे. हा घाट वर उचलला जाणार आहे. या कामासाठीही 7 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय बोट क्लब समोर होणार्‍या रस्त्याने बोटींना नदीत येण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे याठिकाणी अंडरपास करण्यात येणार आहे. या सर्व सुधारित आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Back to top button