नारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | पुढारी

नारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्याजवळ मिना शाखा कालव्यालगत एक बिबट गुरुवारी (दि ४) पहाटे मृतावस्थेत आढळल. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने या बिबट्याला ठोकर दिली असावी असा अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बिबट प्रवण क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात गेल्या चार वर्षात सुमारे सहा ते सात बिबट्यासह वन्यप्राणी अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडले आहेत.

गुरुवारी (दि ४) पहाटे झालेल्या या घटनेची खबर नारायणगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे तसेच स्थानिक नागरिक दिलीप पाटे, नंदू अडसरे, अंबादास वाजगे, चिराग कोराळे यांनी महामार्गावर मध्यभागी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवले. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील कर्मचारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला माणिकडोह येथे शवविच्छेदनासाठी नेले.

Back to top button