पिंपरी : फूट पॅट्रोलिंगचा आदेशच पायदळी | पुढारी

पिंपरी : फूट पॅट्रोलिंगचा आदेशच पायदळी

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे): राज्यामध्ये घडणार्‍या गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध घालून गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी; तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचा व कायद्याचा वचक रहावा, यासाठी पोलिसांची ‘फूट पॅट्रोलिंग’ म्हणजेच पायी गस्त अत्यावश्यक आहे. याबाबत महासंचालक कार्यालयाकडून घटक प्रमुखांना वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही शहर परिसरात पोलिस पायी गस्त घालताना आढळून येत नाहीत. त्यामुळे महासंचालक कार्यालयाकडून आलेला ‘फूट पॅट्रोलिंग’चा आदेशच पिंपरी-चिंचवड पोलिस पायदळी तुडवड असल्याचे पहावयास मिळत आहे.

…तरच पोलिसांची प्रतिमा उंचावेल

राज्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून तसेच आवश्यक ती प्रतिबंधक कार्यवाही करून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, ही मोठी जबाबदारी पोलिस दलावर आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करून गुन्हे नियंत्रणात आणल्यास तसेच गुन्ह्यांना प्रतिबंध घातल्यास पोलिसदल हे सर्वसामान्य जनतेचा विश्वास, आदर आणि सद्भावना जिंकू शकेल. यातूनच पुढे पोलिसांची प्रतिमा उंचावली जाईल, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

कम्युनिटी पोलिसिंगसाठी मदत

पायी गस्तमुळे नागरिक पोलिसांशी मनमोकळा संवाद साधतात. समाजात घडणार्‍या महत्त्वाच्या घटनांबाबत पोलिसांना माहिती पुरवितात. याची पोलिसदलाने हाती घेतलेले कम्युनिटी पोलिसींगचे विविध उपक्रम राबविण्याकरिता मोठ्या प्रमाणात मदत होते. एकंदरीत पायी गस्त घातल्याने पोलिसांना आपल्या हद्दीत विभागनिहाय काय आव्हाने आहेत, नागरिकांना काय अडचणी आहेत, याबाबत जास्त चांगल्या पध्दतीने माहिती मिळते.

पायी गस्तीसाठीचे नियम : गस्त घालण्यासाठी गणवेशातील पोलिसांसोबतच साध्या कपड्यातील पोलिसही असावेत. जेणेकरून नागरिकांमध्ये मिसळणे सोपे जाईल. गस्तीवर वरिष्ठ अधिकार्‍याची नियमित देखरेख असावी. नेहमीच्या मार्गावर गस्त न घालता, अचानकपणे गस्तीच्या मार्गात बदल करावेत. गस्त करताना पोलिस ठाणे कार्यक्षेत्रामधील अभिलेखावरील आरोपींची माहिती, सजा भोगून आलेले, जामिनावर असलेले, फरार व पाहिजे असलेले, संचित रजेवरील आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. विशेषत: पहाटेच्या वेळी संशयितांची तपासणी करावी. ज्या परिसरात रेल्वेस्थानके आहेत, तेथील प्रभारी अधिकारी यांनी स्थानक परिसरात प्रभावी गस्तीचे नियोजन करणे अपेक्षित आहे.

पायी गस्तच परिणामकारक

वाहन गस्तीमुळे पोलिसांची गस्तीबाबतची कार्यक्षमता वाढली असली तरीही गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पायी गस्त महत्त्वाची आहे. पायी गस्तीमुळे पोलिसांची रस्त्यावरील उपस्थिती नागरिकांना जाणवते. ज्यामुळे सुरक्षेची भावना वाढते. पोलिसांचा नागरिकांशी सकारात्मक संवाद वाढतो. त्यामुळे चांगले संबंध प्रस्थापित होतात. पोलिसांबाबत विश्वासार्हता वाढून नागरिक निर्धास्तपणे तक्रारी देण्यास समोर येतात.

येथे हवी पायी गस्त

शहरातील महत्त्वाच्या आस्थापना, धार्मिकस्थळे, संवेदनशील ठिकाणे, बँका, सराफी दुकाने, मॉल, व्यापारी दुकाने येथे पायी गस्त आवश्यक आहे.

सायंकाळी पाचनंतर सर्व प्रभारी अधिकारी यांनी पॅट्रोलिंगसाठी बाहेर पडावे, असे यापूर्वी आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, शहरातील चौकांमध्ये पोलिस तैनात असतात. पायी गस्तबाबतही सूचना दिल्या आहेत.

                                                     – विवेक पाटील,
                                            पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

Back to top button